डोळ्यांच्या विकारावरील प्रभावी उपचार : नेत्र-तर्पण

१. पंचकर्म म्हणजे आयुर्वेदातील अर्धी चिकित्सा. पंचकर्मातील वेगवेगळे उपक्रम आहेत. उदा. डोळे, कान, केस इत्यादी.

२. नेत्रांसाठी उपयुक्त अशा आयुर्वेदिक औषधीद्वारे नेत्राला तृप्त करणे म्हणजे नेत्र-तर्पण.

३. तर्पणासाठी प्रामुख्याने स्नेहाचा उपयोग करतात. विधी – यात सर्वप्रथम नेत्रांना स्वच्छ करतात. नंतर उडदाच्या पिठाने नेत्रांच्या अवतीभोवती पाळी बांधतात. त्यात तुपात सिद्ध केलेले औषध डोळा पूर्ण डुंबेपर्यंत सोडतात.

४. निश्चितच वेळेपर्यंत पापण्यांची उघडझाप करण्यास सांगतात. तर्पण झाल्यावर डोळे पुन्हा स्वच्छ करतात आणि गरम पाण्याने धुतात. तर्पणासाठी कोणते औषध वापरावे? किती वेळ औषध ठेवावे? हे तर्पणाच्या पूर्वीच निश्चित करतात.

५. तर्पण झाल्यावर काही व्यक्तींना 12 तासांपर्यंत अल्प प्रमाणात डोळ्यांमध्ये चूणचूण होते. ती आपोआप कमी होते तरीही ही क्रिया तज्ज्ञ वैद्यांच्या देखरेखीतच करावी.

६. तर्पण केव्हा करावे ? डोळ्यांसमोर अंधारी येणे, पापण्यांवर कोंडा जमा होणे, प्रकाश सहन न होणे, डोळे शुष्क व रूक्ष होणे, पापण्यांचे केस गळणे, नेत्र गढूळ होणे, दृष्टिमांद्य होणे, अश्रुस्राव कमी होणे, कॉर्नियल अल्सर इत्यादी विकार तर्पणसाध्य आहेत. नंतर तर्पण करण्यापूर्वी पंचकर्म केल्यास रुग्णांना तर्पणाचा अधिक लाभ होतो.

७. शक्यतोवर तर्पण सायंकाळी करावे. तर्पणानंतर तेजस्वी व अतिप्रकाशयुक्त वस्तूंकडे पाहू नये. दोषाप्रमाणे आहारात बदल करावा लागतो. या सूचना 1 दिवस पाळाव्यात. तर्पणानंतर झोप चांगली येते. स्राव कमी होतात.

८. डोळ्यांच्या वेगवेगळ्या भागांचा रंग प्राकृत आणि स्वच्छ होतो. दृष्टी निर्मळ होते. डोळ्यांचे सौंदर्य वाढते.

९. नेत्र-तर्पण वर्ज्य : नेत्रामध्ये लाली, दुखणे, खूप अश्रुस्राव, सुजणे ही लक्षणे असल्यास विशेषकरून तर्पण टाळावे.

१०. तर्पणाचे फायदे : नेत्रसौंदर्यासाठी तर्पण करावे. प्रदूषणामुळे डोळ्यातील पांढ-या भागाचा रंग विकृत होतो. या पांढ-या भागाचे सौंदर्य आणि नेत्रातील तेज टिकवून ठेवण्यासाठी 7 दिवस त्रिफळा घृताने रोज तर्पण करावे.

११. सतत कॉम्प्युटरवर काम करणा-या व्यक्तींच्या डोळ्यांवर ताण येऊन त्यांना ड्राय आय सिड्रोम होतो. या व्यक्तींसाठीदेखील तर्पण ल्यूब्रिकेशन म्हणून उपयुक्त आहे. डोळ्यांच्या व्यायामासोबत आठवड्यातून एकदा तर्पण करणे फायद्याचे ठरते.

१२. पक्षाघातानंतर काही रुग्णांना डोळ्यांची पापणी बंद करण्यास त्रास होतो. सतत नेत्रस्राव होतो. डोळा बंद केल्यावरदेखील डोळा उघडा असतो. या व्यक्तींच्या डोळ्यांच्या नसांवर परिणाम होतो. अशा रुग्णांना तर्पणाने त्वरित लाभ होतो.

१३. काही विशिष्ट कारणांमुळे मुलांच्या चष्म्यांचे नंबर वारंवार वाढतात. अशा वेळी अधिक काळ तर्पण केल्याने दृष्टीवर चांगले परिणाम होतात. नेत्र हे व्यक्तिसौंदर्याचे प्रतीक असून व्यक्तिमत्त्व सूचक इंद्रिय आहेत. या नेत्रांचे प्राकृतिकरीत्या रक्षण करण्यासाठी तर्पण उपयुक्त साधन आहे.

Leave a Comment