घरीच केस रंगवण्याचे नैसर्गिक व सुरक्षित उपाय

१. आधुनिक व तणावग्रस्त जीवनशैलीमुळे, आजच्या तरुणांमध्ये प्रत्येक तीनजणांमागे एकात अकाली केस पांढरे होण्याची समस्या आढळून येत आहे.

२. अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येपासून बचावणे कठीण असले तरीही केसांना रंग दिल्याने ते लपवले जाऊ शकतात. मात्र बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकलयुकत रंगांमुळे दुष्परिणाम होण्याची शक्यता देखील तितकीच आहे.

३. टाळूवरील त्वचा ही अत्यंत नाजूक व संवेदनशील असल्याने केमिकलयुक्त रंगाचा केसांवर व शरीरावरदेखील दुष्परिणाम होतो. म्हणूनच नैसर्गिक रंगांची निवड करणे हितकारी आहे.

४. हीना : हीना किंवा मेहंदी त्वचेवर किंवा केसांवर लावल्यास,ते लाल किंवा चॉकलेटी रंगाचे होतात. काळे केस ,पांढरे झाले असल्यास हीनाच्या पावडरमध्ये थोडे तीळाचे तेल व कढीपत्ता एकत्र करून लावल्यास फायदा होतो.

५. कसा बनवाल डाय : थोडे तिळाचे तेल गरम करून त्यात कढीपत्त्याची पाने टाकून तेल हवाबंद ड्ब्यात ठेवा. जेव्हा तुम्हाला केस रंगवायचे असतील तेव्हा त्यात हीनाची पावडर टाकून काही मिनिटांसाठी तेल गरम करून घ्या. मिश्रण थंड होईपर्यंत थांबा व त्यानंतर पेस्ट केसांवर किमान 3-4 तास राहू द्या.त्यानंतर केस शिकाकाईने धुवून टाका.

– जर तुम्हाला केसांना लालसर रंग हवा असेल तर हीनाच्या पावडरमध्ये बीटाचा रस मिसळून ती पेस्ट केसांवर लावा.

– जर तुम्हाला केस तांबूस रंगांनी रंगवायचे असल्यास, हीनाची पावडर , लिंबाचा रस व दही यांचे एकत्र मिश्रण करून त्यात थोडा चहाचा अर्क टाकून केसांना लावा.

– हीना केसांना लाल रंग देते तर नीळ टाकल्याने केसांना निळा रंग मिळू शकतो. मात्र हीना व नीळ एकत्र केल्याने तुम्हाला चॉकलेटी रंगाच्या विविध छटा मिळू शकतात. जर तुम्हाला केस लालसर रंगात हवे असल्यास हीना पावडरचे प्रमाण अधिक ठेवा. तर चॉकलेटी अधिक प्रमाणात करायचे असल्यास नीळ अधिक टाका.

६. चहा आणि कॉफी :

– चहा आणि कॉफी दोन्हींमध्ये केस रंगवण्याची व अधिक तपकिरी करण्याची क्षमता आहे. मात्र त्यासाठी चहा व कॉफीचे मिश्रण दाट असणे आवश्यक आहे. यासाठी चहा पावडर किंवा टी बॅग्सचा वापर करा. व ते गरम पाण्यात मिक्स करून त्याचा वापर करा.

– दाट कॉफीदेखील फार उपयुक्त आहे. कॉफी पाण्यात उकळून ते मिश्रण केसांना लावल्यास गडद तपकिरी रंग मिळेल. यासाठी चहा किंवा कॉफीच्या पाण्यात केस बुडवून ठेवा. कॉफी डाय बनवण्याचा सोपा मार्ग म्हणजे कॉफी काही हेअर कंडीशनरसोबत मिक्स करा व केसांना लावा.

७. आवळा : आवळ्यात केसांना रंग देण्याची क्षमता नाही. मात्र आवळ्यामुळे केसांना चकाकी येते. त्यामुळे केसांना रंग लावण्याचा प्रक्रियेत अंतिम टप्प्यात आवळ्याची पावडर टाकावी. यामुळे रंग केल्यानंतर तुमच्या केसांना चकाकी येईल.

८. अक्रोडाची कवचे : अक्रोडाची टणक कवचं केसांना गडद चॉकलेटी रंग देण्यास मदत करतात. अक्रोडाची कवचं पाण्यात टाकून अर्धा तास उकळा. ते पाणी थंड होऊ द्या. नंतर केसांच्या ज्या भागावर रंग द्यायचा आहे.

– तेथे कापसाच्या बोळ्याने हे पाणी लावा. तासभर केस असेच राहू द्या. त्यानंतर केस सौम्य शाम्पू व पाण्याने धुवून टाका. मात्र गरम पाण्याने केस धुणे टाळा. यामुळे अपेक्षित परिणाम मिळणार नाही. या पाण्याच्या संपर्कात येणार्‍या वस्तूंचेदेखील रंग बदलू शकतात म्हणून हे पाणी तयार करताना विशेष काळजी घ्या.

Leave a Comment