पायांचे सौंदर्य टिकवण्यासाठी सोपे उपाय | Maintain the beauty of the feet in Marathi

१. टाचांना भेगा : टाचांना भेगा पडण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील कॅल्शिअम आणि स्निग्धतेची कमतरता होय. पायाची त्वचा जाड असते. त्यामुळे शरीरात तयार होणारे सिबम (तेल) पायाच्या बाहेरच्या भागांपर्यंत पोहचत नाही. शिवाय पौष्टिक घटक व योग्य स्निग्धता न मिळाल्यामुळे टाचा खडबडीत होतात. व त्यावर भेगा पडू लागतात. टाचांच्या भेगांमुळे आग होणे, दुखणे हा त्रास होतो. शिवाय कधीकधी त्यातून रक्तही येते.

२. त्वचेतील ओलसरपणा कमी झाल्यामुळे तळपायांवर भेगा पडतात.

३. भेगांचा त्रास असा कमी करा : एक केळ आणि एव्होकॅडोचे फळ एकत्र करुन त्याचा लगदा तयार करावा. तळपायांच्या भेगांवर हे मिश्रण लावावे. नंतर १५ मिनिटांनी गरम पाण्याने पाय स्वच्छ धुवावेत. हा उपाय रोज केल्यास पायांवरील भेगा कमी होतील.

४. ऑलिव्ह ऑइलने पायांना मसाज करून अर्धा तासाने कोमट पाण्याने पाय धुतल्यानेही आराम मिळतो. अशा पद्धतीने पायांना रोज मालिश केल्यास त्वचेत ओलसरपणा येऊन पाय मुलायम होतील.

५. लिंबामध्ये नैसर्गिक अॅसिड असते. त्यामुळे त्वचा तिच्या नैसर्गिक स्वरूपामध्ये मुलायम होते.

६. मधामध्ये प्रतिजैविक घटक असतात. चार चमचे लिंबाचा रस, दोन चमचे मध, तसेच एक चमचा ग्लिसरीन एकत्र करून भेगा पडलेल्या जागी लावावे आणि वाळू द्यावे. पंधरा मिनिटानंतर पाय घासायच्या दगडाने (प्युमिक स्टोन) पाय स्वच्छ करावेत. त्यामुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जातील, तसेच पायांचा भेगा कमी होण्यास मदत होईल.

७. अंड्याचा बलक, एक चमचा लिंबाचा रस आणि तांदळाचे पीठ एकत्र करावे. त्यानंतर तळपाय पंधरा मिनिटे कोमट पाण्यात भिजत ठेवावेत. त्यानंतर पाय कोरडे करून हे मिश्रण तळपायांवर लावावे. वीस मिनिटांनंतर कोमट पाण्याने पाय स्वच्छ धुवावेत. त्यामुळे तळपायाच्या त्वचेला ओलसरपणा मिळून मुलायमपणा येईल.

८. दीड चमचा व्हॅसलीन व एक लहान चमचा बोरीक पावडर चांगल्या प्रकारे कालवा व भेगांवर हा जाड लेप लावा (आतपर्यंत त्याचा ओलावा जाणवेल) काही दिवसातच फुटलेल्या टाचा भरू लागतील.

९. टाचा जास्तच फुटलेल्या असतील तर मिथिलेटेड स्पिरीटमध्ये कापसाचा बोळा भिजवून फुटलेल्या टाचेवर ठेवा. असे दिवसातून 3-4 वेळेला करा. त्यामुळे टाचा बर्‍या होऊ लागतात.

१०. कोमट पाण्यात थोडा शाम्पू व एक चमचा सोडा आणि काही थेंब डेटॉल टाका. त्या पाण्यात 10 मिनीटे पाय बुडवून ठेवा. त्वचा मऊ झाल्यावर मिथिलेटेड स्पिरीट लावून टाचांना प्युमिक स्टोनने किंवा मऊसर घासणीने घासून तिथली त्वचा साफ करा. त्यामुळे टाचेवरील माती निघून जाईल. नंतर टॉवेलने पुसून कोमट तेलाने मालीश करा.

११. पॅडिक्यूअर : पॅडिक्यूअर एक सोपा प्रकार आहे. त्याला आपण घरी सुध्दा करू शकतो. पण पायाची अवस्था जास्तच खराब असल्यास पॅडीक्युअर चांगल्या ब्यूटी स्पेशालिस्टकडून करून घेणे चांगले.

१२. पॅडिक्यूअरसाठी साहित्य : छोटा टब, कोमट पाणी, शाम्पू, हायड्रोजन पेरॉक्साईड, नेलपॉलीश, रिमूव्हर, नेलकटर, ऑरेंज स्टीक, क्यूटीकल पुशर, नेल फायलर, प्यूमिक स्टोन, कोल्ड क्रिम, कापूस व टॉवेल.

१३. पॅडिक्यूअरची पध्दत : पहिल्यांदा नेलपेंट रिमूव्हरने पायावरची जुनी नेलपेंट काढा. नेलकटर किंवा छोट्या कात्रीने वाढलेली किंवा वाकडी झालेली नखे कापा. पायाची नखे नेहमी सरळच कापावीत. नेलफायलरने नखांना चांगला आकार द्यावा.

१४. टबात कोमट पाणी घेऊन त्यात थोडा शाम्पू व एक चमचा हायड्रोजन पेरॉक्साइड टाकून मिसळा किंवा कोमट पाण्यात 3 चमचे मीठ, अर्धा लिंबाचा रस, व एक छोटा चमचा गुलाबपाणी टाकून मिक्स करा. त्यात पाय – 10 मिनिटे भिजवून ठेवा. त्यामुळे मृत त्वचा ओलसर होते. 8-10 मिनिटानंतर प्यूमिक स्टोन किंवा घासणीने (नरम) घासून घाण साफ करा. पायापासून मळ निघाल्यावर स्वच्छ टॉवेलने पाय पुसा. त्यानंतरपायाच्या नखांवर क्रिम लावून चांगल्या‍ र‍ितीने मालीश करा. मालीश केल्यावर ऑरेंज स्टिकवर थोडा कापूस लावून नखाच्या आतला मळ साफ करा. क्युटीकल पुशरच्या सहाय्याने नखाच्या जवळचा भाग आतल्या बाजूला ढकला. त्यामुळे नखाचा आकार चांगला दिसू लागेल.

१५. पायांवर कोल्ड क्रिमने 10-15 मिनिटे मालीश करा. त्यामुळे पायाची त्वचा मुलायम होईल. कापसाच्या बोळ्यानी नखे व त्वचेवरचे क्रिम पुसून टाका. पॅडिक्यूअर नंतर पायांना धुळ, घाणीपासून वाचवा. आणि कमीतकमी 4 दिवस मोजे वापरावेत. मोज्यांचा वापर तुम्ही पुर्ण हिवाळाभरही करू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *