नाकाचे रोग

१. घ्राणेंद्रियें जें नाक त्यायोगें बर्‍या व वाईट गंधांचें ज्ञान मेंदूस होतें; परंतु त्यास त्याच्या नाना ठिकाणीं नाना प्रकारचे रोग होतात; व म्हणून तें इंद्रिय आपल्या परिचयांतलें असलें तरी रोगपरीक्षणार्थ त्याचे भाग पद्धतशीर रीतीनें तपासण्याची माहिती पाहिजे. नुसत्या डोळ्यांनीं बहुधां हें कार्य करतां येतें. परंतु त्याजोगता एक बारीक आरसा जो घशांत घालतां येऊन नाकपुड्यांचा घशांतील मागील भाग प्रकाशित करील अशा प्रकारचा जवळ असल्यानें परीक्षणास मदत होते.

२. नाकपुड्यांतील रोग : घुणघुणा फुटणें:- मेंदू, यकृत या ठिकाणीं रक्ताधिक्य झाल्यास घुणघुणा फुटल्यानें बरें वाटतें. मुलांची यौवनावस्था, म्हातारपण, यकृतरोग, हद्रोग, व मूत्रपिंडाचे रोग या अवस्थेंत रक्त खराब व पातळ होणें, रक्तपित्त, कांहीं प्रकारचे ताप व रक्तस्राव होण्याची प्रकृति असणें, नाकास व डोक्याच्या कवटीच्या तळास मार, इजा, धक्के इत्यादि लागणें अगर अस्थि भंग होणें; आंतील पडद्यास, रक्तग्रंथी, श्र्लेष्मल ग्रंथी, असाध्यग्रंथी अगर हाडीव्रण असणें हीं मुख्य कारणें होत. रक्त एका अगर दोन्ही नाकपुड्यांतून येतें किंवा मागील छिद्रांतून तें गिळलें जातें अगर तोंडांतून बाहेर व्हातें अगर श्वासनलिकेंत शिरून खोकला व ठसका उत्पन्न करतें.

– उपचार : सशक्त माणसांत रक्तस्राव आपोआप थांबतो व फार तर साधे उपचार करावे व थोडेंफार रक्त गेल्यानें फायदाच असतो. म्हणून तें अगदीं ताबडतोब बंद करूं नये. रोग्यास उताणा निजवून त्याचे हात डोक्याकडे पसरून ठेवावे व डोकें अमळ उंच राहील असें ठेवावें. त्यास बर्फ चोखण्यास द्यावा. अति थंड अगर कढत पाण्याची पिचकारी हळूहळू नाकांत सोडावी, मानेस अगर नाकास बर्फ लावावें. हात व पाय गरम ठेवावे, पोटामध्यें अर्गटचा अर्क, क्यालशियम् लॅक्टेट हीं ओषधें द्यावींत. नाकांत पिचकारीनें घालण्यास तुरटीचें पाणी, आयर्न क्लोराईडचें पाणी हीं औषधें चांगलीं, अगर हेझेलिन किंवा अड्रिनेलिनचे थेंब घालावे अगर त्यांत कापूस भिजवून त्याचा बोळा नाकांत ठेवावा. अगर रक्तस्रावाच्या ठिकाणी विजेची पेटी लावावी. वरील उपचार करण्याच्या अगोदर कोणतें कारण संभवत आहे हें पाहून उपचार करावे.

३. जुनाट पडसें : कारणें- मुलांची अशक्त व क्षयी प्रकृति, वरचेवर पडसें येणें, घशाच्या मागें मऊ व बिलबिलीत बारीक ग्रंथी असणें, मधील पडदी वांकडी असणें, चिंचोळ्या नाकपुड्या, तपकीर फार ओढणें इत्यादि. या रोगाचे तीन प्रकार अगर अवस्था आहेत.

(अ) नाकांतून पांढरा-पिवळा शेंबूड येणें, व नाक आतूंन लाल होणें. परंतु नाकांतील त्वचा जाड न होणें व त्यांतून दुर्गंधिमय खपल्या न निघणें व नाकाची घाण न येणें हीं लक्षणें असतात.

(आ) मागील रोगाची हयगय झाल्यानें नाकाची अंतस्त्वचा सजून लाल होते व त्यांतून पांढरा पिवळा शेंबूड फार येतो, आवाज नाकांतून येतो, नाक चोंदल्यामुळें वरचेवर शिंकरावें लागतें व श्वासासाठीं तोंड उघडें ठेवणें जरूर असल्यामुळें चेहरा बावळट दिसतो, शेंबूड नाकाच्या मागून घशांत उतरतो व तो खांकरून थुंकावा लागतो. याचा कानाशीं संबंध असल्यामुळें बहिरेपणाहि येतो. ठसका, दमा अगर घरेंसुद्धां यामुळें होतें. बाहेरून नाकपुड्या जाड दिसतात. मागील छिद्रें तपासलीं असतां तेथें त्वचा सुजलेली दिसून त्याच्या गांठीहि बनलेल्या असतात. याच रोगाचें तिसर्‍या प्रकारांत पर्यवसान होतें

(इ) पीनस रोग:- नाकांतील अंतस्त्वचेची सूज ओसरून ती रुक्ष होऊन त्याखालील रचनेचा नाश होणें हें लक्षण यांत असतें व म्हणून यांत नाकपुड्या फार मोठ्या दिसतात. अंतस्त्वचा नेहमीपेक्षां कमी लाल दिसते व तीवर हिरव्या व पिंवळ्या खपल्या धरतात. बहुतेक रोग्यांच्या नाकाला या खपल्याखालीं जमणार्‍या स्रावामुळें अत्यंत दुर्गंधी येते. जुनाट पडश्यामुळेंच असें झालें असल्यास खपलीखालीं व्रण बनतो. उपदंश वगैरे इतर कारणांमुळें नाक बिघडून त्यांत व्रण व दुर्गंधी येते तो प्रकार पुढें येईलच.

उपचार : आरंभीच न कंटाळतां खटपट केली तर हा रोग बरा होतो. परंतु शेवटच्या पीनसाच्या अवस्थेपर्यंत जाऊं दिल्यास पूर्ण बरा होत नाहीं. रोग्याची प्रकृति तो क्षयी व अशक्त असल्यास कॉडलीव्हर आईल, मालटाईन, आयर्न आयोडाईड, या औषधांनीं सुधारावी. नाक स्वच्छ करण्यासाठीं औषधें घालावयाचीं तीं तुषार उडवण्यार्‍या पिचकारीनें घालावीं व त्यासाठीं हायड्रोजन परॉक्साईड हें औषध चांगलें आहे. त्यानंतर त्या भागास स्तंभत्व – येण्यासाठीं टॅनिक असिड, झिंक सल्फोकार्बोलेट, टर्पिन, कोकेन व थायमॉल हीं औषधें पातळ पेट्रोलिअममध्यें यथायोग्य प्रमाणांत विरघळून घालावींत. अंतस्त्वचा फार जाडी असल्यास तिला क्रोमिक असिड लावावें. अगर कांहीं व्यंग असल्यास शस्त्रक्रिया करावी. पीनस रोगासाठीं दुर्गंधी कमी होण्यास कॅर्बोलिक असिड, बोरॅक्स, अरिस्टॉल इत्यादींच्या धावनांचा उपयोग करावा अगर दुर्गंधीनाशक पूड नाकानें ओढावी व पोटामध्यें कंकोळयुक्त औषध द्यावें.

४. नाकांत व्रण होणें : हा क्षयी व अशक्त प्रकृतीमुळें होतो व तो हाडापर्यंत गेल्यानें नाक बसकें व विद्रूप होतें.

– उपचार:- पोटांत कॉडलिव्हर ऑईल वगैरे घेऊन प्रकृति सुधारावी व वर सांगितलेल्या धावनानें अगर आयडोर्फाम किंवा ल्याक्टिक आसिड लावून व्रणाचें स्थान शुद्ध करावें. व्रण जुनाट असल्यास शस्त्रानें खरडावा किंवा आंतील नासक्या हाडाचा तुकडा काढावा.

५. फिरंगोपदंशसंबंधीं नासारोग : लहान मुलास हा रोग (आईच्या संसर्गानें वगैरे) झाल्यास प्रथमावस्थेंत पटकुळ्या येऊन पडसें येतें व त्यामुळें श्वासोच्छासाच्या वेळीं मोठा आवाज, हीं लक्षणें होतात. यापुढील स्थितींत नाकपुडींत व्रण होतो व “गमा” नामक ग्रंथि होतात व त्यामुळें आंत चरत जाणारे खोल हाडीव्रण होऊन हाडें कुजून जातात व पू वाहून नाक खचतें व नंतर वसकें होतें, नंतर मधील पडदी झडते, टाळूस भोंक पडतें व नंतर नाकावरील मांस व त्वचा झडून गेल्यावर माणूस फार विद्रूप दिसतें. फार दिवस टिकणारा स्राव व हाडाची एक विशिष्ट दुर्गंधी व जुनाट पडशाप्रमाणें नाकाची अंतस्त्वचा सुजलेली नसणें आणि पूर्वी उपदंश झाल्याचा पुरावा मिळाल्यानें रोगनिदान होऊन उपचार करणें सोपें होतें.

– उपचार : पोटांत पोटॅशियम आयोडाईड हें औषध द्यावें; व त्याबरोबर क्किनाईन, सिंकोना, व नाना पारदभस्म प्रकारांपैकीं एखादा योग्य प्रकार योजून द्यावेत व पिनस रोगांत सांगितल्याप्रमाणें नाकावर धुण्याचे उपचार करावेत. कुजकें हाड शस्त्रक्रियेनें नाकपुड्याच्या पुढील अगर मागील छिद्रांतून काढून टाकावें.

६. लेंकरांनां सांसर्गिक फिरंगोपदंश रोग झाल्यास पोटांत कांहीं महिने ग्रे पावडर हें औषध सूक्ष्म प्रमाणांत देऊन नंतर पोट्याशियम आयोडाईड दिल्यानें आश्चर्यकारक गुण येतो. नंतर कॉडलिव्हर आईल द्यावें.

७. ल्यूपस नामक त्वग्रोग नाकाबाहेर होतो. तो कधीं नाकाच्या पडदीस होऊन तेथें छिद्र पडल्यानें स्राव सुरू होतो. तेथील जागा लाल होऊन तीवर कोंडा व खपल्या जमतात, व त्या काढल्या तर त्यांखालीं मऊ व्रण दिसतो.

– उपचार : पोटांत कॉडलिव्हर आईल व सोमल हीं पौष्टिक औषधें देऊन रोगनाश करणारीं ल्याकटिक असिडें वगैरे औषधें लावावीं अगर शस्त्रानें खरडावें अगर “क्ष” किरणांचा उपयोग करावा.

८. नासाश्मरी : मुतखड्याप्रमाणें चुन्याच्या फॉस्फेटचें कीट नाकांत जमून खडा बनतो व त्यामुळे शेंबूड स्राव, नाक चोंदणें हीं लक्षणें होतात. निदान करतांना अस्थिग्रंथि अगर क्यान्सर आहे कीं काय असा घोंटाळा होतो.

उपचार : खडा चिमट्यानें ओढून काढावा. खडा मोठा असल्यास प्रथम तो फोडण्याचें शस्त्र असतें त्यानें प्रथम बारीक करून काढावा. आगंतुक पदार्थ आंत शिरल्यासहि वरीलच उपचार उपयोगी आहेत.

Leave a Comment