महिलांना पायाचे सौदर्य खुलवण्यासाठी अलंकार

१. अंदु (साखळय़ा)- अंदु हा कानडी शब्द आहे. हत्तीच्या पायातल्या भक्कम साखळीला अंदु हा शब्द वापरला जातो. महाराष्ट्रातही यादव काळापासून अंदु हा शब्द वापरात होता. नामदेवांचा अभंग- परब्रह्म निष्काम, तो हा, गौळिया घरी। वाक्या वाळे अंदु कृष्णा, नवनीत चोरी॥ हा अभंग आजही महाराष्ट्रात सर्वख्यात आहेच.

२. शिवकाळात व नंतर हळूहळू अंदु शब्द मागे पडत चालला व साखळय़ा हा शब्द रूढावला. हा अलंकार पेशवेकाळात मराठे सरदारांनी राजस्थान, माळवा या प्रदेशातही नेऊन तेथेही तो लोकप्रिय केला.

३. छंद : ‘नक्षीदार, चांदीच्या जाड सुताचे पायात घालावयाचे पैंजण’ असे या अलंकाराचे स्पष्टीकरण सुवर्णकारांकडून मिळते. तथापि तो प्रत्यक्षात कोठे पाहण्यात येत नाही.

४. रूळ : गोल मण्यांचा गजरा बनवल्यासारखा दिसणारा हा चांदीचा अलंकार असून देशभापेक्षा कोकणामध्ये याचा प्रसार अधिक असल्याचे दिसून येते.

५. तोरडय़ा : तोडर हा संस्कृत शब्द आहे. तोडर हा प्राचीन काळापासून वापरात असलेला अलंकार आहे. मध्ययुगानंतरच्या काळात तोडर या मूळच्या शब्दाचे तोरडय़ा असे रूपांतर झाले. ह्य़ा तोरडय़ा आजच्या घटकेलाही अगदी लहान मुलांपासून मोठय़ा मुली, स्त्रिया यांच्या वापरात आहे.

६. पैंजण : पैंजण हा पर्शियन भाषेतील शब्द असून मुस्लिम धर्माच्या लोकांबरोबरच हा अलंकार भारतात आला. आजही मुसलमान स्त्रियांच्याच पायात तो महाराष्ट्रातही दृष्टीस पडतो. पेशवेकाळात तो ‘पायजीव’, ‘पायजिभी’ अशा अपभ्रष्ट रूपात इथल्या मराठी लोकांकडून उच्चारला जाऊ लागला होता.

७. अनवट : अनवट हा शब्द उत्तर भारत प्रदेशात प्रचलित आहे. पायाच्या अंगठय़ात चांदीचे जाडजूड व भक्कम कडे बसवलेले असते, त्याला ‘अनवट’ असे नाव आहे. महाराष्ट्रात अनवटप्रमाणेच ‘अनोठ’, ‘आनवटा’, ‘हणवट’ अशी अपभ्रष्ट शब्दरूपेही लोकांच्या बोलण्यात व लिहिण्यात आहेत. ‘अंगुस्ठा’ असाही एक शब्द या दागिन्याला लावला जातो. कन्नड भाषेत यासाठी ‘पोल्हारा’ असे नाव आहे आणि मराठा कालखंडातील सर्व वाङ्मय प्रकारात ‘पोल्हारा’ हा शब्द अनेकदा आढळून येतो.

८. विरोद्या : (विरोल्या, विरवल्या)- जोडवी आणि विरोद्या ही हिंदू स्त्रिया ‘सौभाग्यचिन्हे’ मानतात. त्यापैकी विरोद्या पायाच्या दुसऱ्या बोटात, तर जोडवी ही पायाच्या तिसऱ्या बोटात घालण्याची सर्वसामान्य प्रथा आहे.

९. गेंद : गेंद म्हणजे गुच्छ. जोडव्यालाच वरच्या बाजूला दोन-तीन लहान घुंगरे जोडली की त्याला गेंद असे नाव मिळते. या गेंद अलंकारालाच काही ठिकाणी ‘कांदेफुले’ असेही म्हटले जात असल्याचे मला आढळून आले आहे. त्याशिवाय या गेंद अलंकारालाच ‘विंचू’ असेही म्हणण्याची पद्धत काही ठिकाणी दिसून आली. उत्तर भारतात ‘बिच्छु’, ‘बिछवे’ म्हणून असाच एक अलंकार प्रचलित आहे, त्यावरून हे नाव येथे आले असावे असे वाटते.

१०. करंगुळय़ा : पायात करंगळीमध्ये घालण्याचा जोडव्यासारखा अलंकार. याला ‘वेढे’ किंवा ‘वेढणी’ असाही शब्द प्रचलित आहे. हल्ली हा अलंकार फारसा आढळत नाही. पण करंगुळय़ा हा शब्द लावणी आणि लोकगीतात अनेकदा आढळला आहे.

११. मासोळ्या : माशाच्या रूपाकाराची उठावदार आकृती करून ती जोडव्याच्या वरच्या बाजूने लावली असते. या अलंकाराला मासोळी असे नाव आहे. महाराष्ट्रात नागर स्त्रियांमध्ये कमी परंतु ग्रामीण भागात स्त्रियांच्या बोटांमध्ये हा अलंकार सर्रास आढळतो. मासोळ्या पायाच्या चौथ्या बोटात घालण्याची प्रथा आहे.

१२. जोडवी : पायाच्या मधल्या बोटात घालण्याचे चांदीचे वळे. कधी कधी एकाच बोटात दोन जोडवीही घातलेली दिसतात. त्यातील लहान जोडव्याला खटवे असे म्हटले जाते. लहान मुलींच्या पायाच्या बोटात कसलाही दागिना घालण्याची पद्धत नाही. स्त्रियांच्या पायाच्या बोटांवर पहिला अलंकार चढतो तो जोडवे. पायाच्या मधल्या बोटावर विवाहप्रसंगी वधू जेव्हा गौरीहरा पूजते तेव्हा जोडवी घातली जातात आणि ती आयुष्यभर ठेवण्याची प्रथा आहे.

Leave a Comment