महिलांना हाताचे सौदर्य खुलवण्यासाठी अलंकार

१. हात म्हणजे बाहू, भुजा. या अवयवावर तीन ठिकाणी अलंकार घालण्याची रूढी आहे. पहिली जागा म्हणजे दंड. त्यानंतर मनगट आणि शेवटी हाताची बोटे. स्त्रियांच्या बाबतीत या तीनही जागा विविध अलंकार दृष्टीस पडतात. पुरुषांच्या किंवा मुलांच्या (शिशूंच्या) हातावर एवढे दागिन्यांचे ओझे नसते. स्त्रियांचे दंडावरचे दागिने असे आहेत-

२. ताळेबंध : हा दंडावरील चांदीचा अलंकार असून नागरजनांपेक्षा ग्रामीण भागांतील स्त्रियांमध्ये तो अत्यंत लोकप्रिय आहे आणि ‘तोळबंदी’, ‘तुळवंदी’ अशा काहीशा अपभ्रष्ट नावांनीच तो ओळखला जातो.

३. नागोत्र : नागाच्या वेटोळय़ांप्रमाणेच दंडाभोवती रचना केल्याप्रमाणे दिसणारा हा अलंकार आहे. ग्रामीण भागात तो चांदीचा असून ठसठशीत दिसणारा असा असतो, तर शहरी भागात तो सोन्याचा व अधिक नाजूक कलाकुसरीचा दिसतो. या दागिन्याला ‘नागवाकी’,‘नागोत्तर’ अशीही नावे आढळून आली.

४. वेळा : ग्रामीण भागात दंडावरच परंतु जरासा खाली कोपराजवळ घातला जाणारा हा अलंकार आहे. कित्येक ठिकाणी त्याला ‘कोपरवाळी’ असेही म्हटले जाते.

* मनगट :

१. जवे : जव किंवा यव धान्याच्या दाण्याच्या आकाराचे सोन्याचे मणी सोन्याच्या बांगडीवर चिकटवून या बांगडीला उठाव आणला जातो, त्या अलंकाराला ‘जवे’ असे नाव आहे. हा मुळात गुजरात-राजस्थानकडील अलंकार. आपणाकडे त्याचा फारचा अढळ नाही. गुजरातेत ‘जवे’ आणि ‘पिछोडय़ा’ अशी जोडी असते. त्यापैकी जव ही बांगडी मनगटावरील सर्व अलंकारामध्ये अगदी पुढे घालावयाची आणि पिछोडी सर्वात मागे म्हणजे कोपरानजीक घालावयाची अशी तेथे पद्धत आहे.

२. गजरा : हा मोत्यांचे सर एकत्र बांधून मनगटावर घालण्याचा अलंकार महाराष्ट्रात सर्वत्र रूढ नसला तरी अनेक ठिकाणी पाहावयास मिळतो.

* हाताची बोटे :

१. भोरडी : सोन्याच्या गोल वळय़ाला सोन्याच्याच बारीक तारेने संपूर्णपणे गोल गोल वेढे देऊन तयार केलेली अंगठी.

२. आरसी : हा उत्तर भारतातून इकडे आलेला खास स्त्रियांसाठी असणारा अंगठीचा प्रकार आहे. आरसी म्हणजे आरसा असलेली अंगठी. एका वळय़ाला दर्शनी भागावर जडवलेली छोटीशी गोल आकाराची सोन्याची डबी आणि तिच्या झाकणावर तसाच छोटा गोल आरसा अशी या अंगठीची रचना असते. ही अंगठी फक्त डाव्या हाताच्या अंगठय़ावरच घालावयाची अशी पद्धत आहे. या डबीत सिंदूर किंवा कुंकू ठेवलेले असते. ऐन प्रसंगी, गरजेच्या वेळी या डबीतून कुंकू काढून व वरच्या आरशात पाहून ते कपाळी लावायचे यासाठी खास सुविधा म्हणून ही अंगठी.

३. घोडा अंगठी : ही एक अगदी वेगळय़ाच प्रकारची अंगठी ग्रामीण समाजामध्ये दिसून येते. विशेषत: कोकण-दाभोळ भागात त्याचप्रमाणे देशावर बारामती, अहमदनगर या भागातील ग्रामीण जनतेमध्ये तिचा वापर असल्याचे जाणवले. उच्चवर्णीयांमध्ये ही कोठेच नाही. ही अंगठी म्हणजे गोल वळे नव्हे.

Leave a Comment