लहान मुलांचे आजार

१) न्यूमोनिया –

– न्यूमोनिया हा श्वसन संस्थेचा आजार आहे. न्यूमोनिया हा जंतूमुळे पसरणारा आजार आहे. न्यूमोनिया फुफ्फुसाच्या काही भागातच होतो.

– या जंतूमुळे श्वासनलिकेला व फुफ्फुसाला सूज येते त्यामुळे वेदनाही होऊ शकतात. न्यूमोनिया हा अचानक येणारा कमी कालावधीचा तीव्र आजार आहे व उपचार न केल्यास माणूस मरू शकतो.

– न्यूमोनिया हा आजार कोणताही होऊ शकतो. पण पाच वर्षाखालील मुलांमध्ये न्युमोनियाचे प्रमाण जास्त आढळते व भारतामध्ये बरीच मुले या आजाराने दगावतात.

लक्षणे –

– पाच वर्षाखालील मुलामुलीमध्ये छाती उडते व त्याचबरोबर ताप असल्यास न्यूमोनियाची शक्यता जास्त असते. बोटाने छातीवर वाजवून बघितल्यास फुफ्फुसाच्या सुजलेल्या भागावर ठप्प असा आवाज येतो. लहान मुलांना श्वास घेताना त्रास होतो. आईचे दूध नीट ओढता येत नाही.

उपचार –

– न्यूमोनिया हा गंभीर आजार असल्यामुळे योग्य त्या डॉक्टरांकडून उपचार होणे आवश्यक असते. वरीलपैकी काहीही लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांकडे जावे. त्यामुळे लवकरात लवकर उपचार सुरु होऊन तीव्रता (गंभीरता) कमी होऊ शकते.

२) अतिसार –

– जुलाबाचे मुख्य कारण पोटात विषारी जीवाणू जाणे हेच असते. अस्वच्छता आणि दूषित पाणी यामुळे हे जीवाणू पोटात जातात. बाळ खाली पडलेली खेळणी किंवा इतर काही वस्तू तोंडात घालते. यामुळे खालची घाण पोटात जाते व बाळाला जुलाब होऊ लागतात.

– काही लोक दाताचे जुलाब म्हणून याकडे दुर्लक्ष करतात. पण दात येण्याचा व जुलाबाचा काहीही संबंध नसतो. अशा जुलाबातून शरीरातील पाणी बाहेर पडते. यामुळे मृत्यू ओढवू शकतो.

अतिसार (जुलाबात) बाळाची काळजी कशी घ्यावी ?

– अतिसार म्हणजे जुलाब होणे. जुलाब होणाऱ्या मुलाला भरपूर पातळ पदार्थ दयावेत. शहाळ्याचे पाणी दयावे. फळांचा ताजा रस दयावा. भाताची कांजी, भाताची पेज, भाज्यांचे सुप, वरण असे पदार्थ दयावेत. अंगावरचे दूध चालू ठेवावे.सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे बाळाला जल संजीवनी दयावी. एवढे करून फरक न पडल्यास डॉक्टरांना दाखवावे.

जल संजीवनी म्हणजे काय ?

– अतिसारावर उपयोगी पडणारे हे एक पेय आहे. एक लिटर उकळून गार केलेले पाणी घेऊन त्यात आठ चमचे साखर, चार चिमटी मीठ आणि चवीपुरते लिंबू हे सर्व एकत्र करून घ्यावे.हि जल संजीवनी शरीराच्या बहरत पडलेले पाणी भरून काढण्यासाठी उपयोगी पडते.

३) गोवर –

– गोवर हा लहान मुलांमध्ये आढळणारा, लागण होणारा आजार आहे. यात आधी सर्दी, खोकला, ताप आणि मग अंगावर पुरळ उठते. निरोगी मुलांना याचा फारसा त्रास होत नाही पण मूल जर कुपोषित असेल तर गोवारामुळे वेगवेगळे आजार होऊ शकतात व मृत्यूही येऊ शकतो.

लक्षणे –

– डोळे खूप लाल होणे, सर्दी, बारीक ताप, खोकला तसेच तोंडावर, गालावर लालसर ठिपके येतात व पुरळ येते. हे ठिपके म्हणजेच गोवर ओळखण्याचे हमखास लक्षण आहे. ताप हळू हळू वाढत जातो व पूर्ण अंगभर कानाच्यामागे चेहरा, मान, छाती, पोट याप्रमाणे पुरळ येते व शेवटी हातापायावर पसरते पण कधीकधी पुरळ हातापायावर यायच्या आधीच गोवर कमी होतो.

– गोवराचे पुरळ ज्याप्रमाणे येते. त्याचप्रमाणे म्हणजे वरून खाली नाहीसे होते. तोंडातील पुरळामुळे भूक मंदावते. खोकला मात्र थोडे दिवस टिकतो. ताप उतरून नंतर पुन्हा आला किंवा पुरळ पायापर्यंत गेल्यावर सुद्धा ताप कमी झाला नाही तर त्यातूनच पुढे न्यूमोनिया किंवा इतर आजार होऊ शकतात.

उपचार –

गोवरची लस देणे हा प्रतिबंधक उपाय आहे. ही लस सरकारी दवाखान्यात मिळते. ही लस मूल ९ महिन्यांचे असतांना देतात. लस टोचल्यावर थोडा ताप, अंग लाल होते व पुरळ येते. गोवर झाल्यास त्वरीत डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत.

४) कांजण्या –

– कांजण्या हा लहान मुलांचाच आजार आहे. कांजण्याचे जंतू श्वासावाटे शरीरात प्रवेश करतात. अंदाजे दोन आठवड्यानंतर रोगाची लक्षणे दिसू लागतात.

लक्षणे –

– आजाराच्या सुरुवातीला थंडीताप, पाठदुखी, खोकला, सर्दी, डोळे लाल होणे अशी लक्षणे दिसतात. नंतर एक दोन दिवसांत अंगावर पुरळ येते. हे छाती पोट यावर जास्त दिसते. पुरळ सुरुवातीला लालसर असते. मग त्यात पाणी भरते. पू होतो आणि नंतर खपली धरते.

– हे सर्व पाच दिवसांत होते. हे पुरळ एका पाठोपाठ एक असे दोन तीन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी अंगावर दिसते. खपली धरायला सुरुवात झाली की आजार संपत आला असे समजावे.

उपचार –

– प्रतिबंधक लस देता येते. परंतु ही लस सरकारी लसीकरणाच्या कार्यक्रमात मिळत नाही. ही खाजगी डॉक्टरकडून विकत घेऊन द्यावी लागते.

५) मुडदूस –

– ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे लहान मुलांमध्ये दिसणारा आजार म्हणजे मुडदूस होय. हाडांमध्ये चुन्याचे क्षार जमून हाडे मजबूत होण्यासाठी ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता असल्यामुळे हाडे ठिसूळ व मऊ बनतात.

लक्षणे –

– कपाळ पुढे आलेले दिसते.

– विकास हळूहळू होत असतो.

– सांध्यांच्या बाजूच्या हाडांची टोक फुगतात.

– सांधे सुजल्यासारखे दिसतात.

– छातीच्या फासळ्या व पायांना बाक येतो.

– पोट मोठे दिसते.

– टाळू नीट भरलेली दिसून येत नाही.

उपचार –

– बाळाला कोवळ्या उन्हात १०- १५ मिनिटे ठेवल्यास ‘ड’ जीवनसत्वाची गरज भागते. कारण त्वचा/कातडी सूर्यप्रकाशाच्या मदतीने ‘ड’ जीवनसत्व तयार करते. भरपूर दूध, माशाचे तेल, अंडी, मांस इत्यादी गोष्टी खाव्यात/खायला दयाव्यात.

६) माती खाणे –

– ही तक्रार मुख्यत: लहान मुलांमध्ये, पण कधीकधी मोठया वयातही आढळते. (विशेषत: गरोदरपणी अनेक स्त्रियांची ही तक्रार असते.) यात माती, भिंतीचा रंग, राख,चुना, खडू, पेन्सिल, इत्यादी एरवी ‘अखाद्य’ असे अनेक पदार्थ येतात. माती खाण्याची तक्रार उद्भवण्याची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे-

– आहारात लोहक्षाराची कमतरता.

– दीर्घकाळ निव्वळ स्तनपान व बाळास वरचे अन्न वेळेवर सुरू न करणे.

– कुठल्याही कारणाने आलेली रक्तपांढरी.

– काही मानसिक कारण उदा. दुर्लक्ष झाल्याची भावना मनात बळावणे.

– माती खाणे हा विकार सहा ते सात महिन्यांनंतरच्या मुलांमध्ये दिसते. वयाच्या दोन वर्षापुढेही माती खाणे टिकल्यास तपासणी करून घ्यावी.

उपचार –

– आहारात लोहक्षार व चुनायुक्त पदार्थ असावेत. (पाहा पोषणावरचे प्रकरण) ,कॅल्शियम, मुलाला लोहक्षाराच्या गोळया किंवा औषध द्यावे.

– माती खाणाया मुलांना जंतविकार होतो. त्यामुळे त्याला जंताचे औषध द्यावे. रंग़ीत द्रव्ये (उदा. भिंतीचा रंग), इत्यादी पोटात गेल्याने होणारे आजार होऊ शकतात. यासाठी डॉक्टरकडे पाठवावे.

७) रातांधळेपणा (‘अ’ जीवनसत्त्वाचा अभाव) –

– या आजारात माशाच्या खवल्यासारखे डाग डोळयाच्या पांढ- या भागावर दिसू लागतात. हे डाग बुबुळाच्या बाहेरच्या बाजूला असतात. पण नाकाच्या बाजूला कधी येत नाहीत.

– डोळयात काजळ घातल्यावर या खरखरीत भागावर काजळ साचून हा भाग उठून दिसतो. या खवल्यासारख्या भागाला बिटॉटचे ठिपके म्हणतात. (बिटॉट हे एका शास्त्रज्ञाचे नाव आहे.) आता हा आजार फार क्वचित आढळतो.

८) ड’ जीवनसत्त्वाचा अभाव (मुडदूस) –

– हाडांमध्ये चुन्याचे क्षार जमून हाडे मजबूत होण्यासाठी ‘ड’ जीवनसत्त्वाची गरज असते. ‘ड’जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास हाडांमध्ये चुन्याचे क्षार न जमल्याने हाडे दुबळी व मऊ बनतात.

लक्षणे व रोगनिदान –

– अशा मुलांचे कपाळ पुढे आलेले दिसते.

– घाम जास्त येतो.

– पुढची टाळू वर्षानंतरही वयाच्या प्रमाणात भरलेली नसते.

– एरवी एक वर्ष वयाला खूपच थोडी टाळू शिल्लक राहिलेली असते व दीड वर्षापर्यंत भरून येते.

– विकासाचे टप्पे लांबतात. उदा. आठ नऊ महिन्यांचे झाले तरी अजून बाळ बसत नाही, एक वर्षाचे मूल उभे राहत नाही, चालण्याचे वय लांबते.

– सांध्याच्या बाजूची हाडांची टोके फुगतात व सांधे सुजल्यासारखे दिसतात (विशेषत: मनगटे, गुडघे),

– छातीच्या फासळया व पायांना बाक येतो.

– पोट मोठे दिसते.

प्रतिबंधक उपाय-

– दूध, माशाचे तेल, अंडी, मांस, इत्यादींमध्ये ‘ड’ जीवनसत्त्व भरपूर असते. सूर्यप्रकाशात (विशेषत: कोवळे ऊन) त्त्वचेखाली ‘ड’ जीवनसत्त्व त्यार होत असते. म्हणून मुले बाहेर हिंडायच्या वयाची झाली, की मुडदूस आपोआप कमी होतो. बाळास रोज सकाळच्या कोवळया उन्हात 1५\ मिनिटे ठेवल्यास ‘ड’ जीवनसत्त्वाची गरज भागते.

उपचार –

– ‘ड’ जीवनसत्त्वाची पुडी एकदाच दूधातून द्यावी. ‘ड’ जीवनसत्त्वाचा डोस दर सहा महिन्यांतून एकदा देता येतो.

– ‘ब’ जीवनसत्त्वाचा अभाव

– ‘ब’ गटात काही उपप्रकार आहेत.

– ‘ब’ गटातील जीवनसत्त्वे ही हिरव्या भाज्या, मोड आलेली धान्ये (उदा. मोड आलेली मटकी, मूग, वाटाणे, हरबरे) दूध, प्राणिज पदार्थात असतात, तांदूळ- गहू यांच्या बाहेरच्या आवरणात ‘ब’ जीवनसत्त्वे असतात. कोंडा पूर्ण काढून टाकला तर कोंडयाबरोबर ही जीवनसत्त्वे जातात. तसेच भाजी शिजवून वरचे पाणी टाकून दिल्यास या पाण्यात जीवनसत्त्वे निघून जातात. म्हणून धान्याचा कोंडा पूर्ण काढू नये, आणि भाज्या जास्त शिजवून पाणी काढून टाकू नये.

– ‘ब’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे तोंड येणे. गालांवर चट्टे येणे, तोंडाच्या आत फोड येणे या खुणा दिसतात. ओठांच्या कडा चिराळतात.

– ‘ब’ गटातील फॉलिक ऍसिडमुळे गर्भाची वाढ चांगली होते. तसेच रक्तप्रमाण सुधारते. हे जीवनसत्त्व हिरव्या भाजीपाल्यात असते.

– उपचार
– ‘ब’ जीवनसत्त्वयुक्त आहार

– ‘ब’ जीवनसत्त्वाच्या गोळया किंवा औषध. (या गोळया कोणत्याही केमिस्टच्या दुकानात मिळतात.)

‘क’ जीवनसत्त्वाचा अभाव –

– आईच्या दुधामध्ये ‘क’ जीवनसत्त्व कमी असते. त्यामुळे सहा महिन्यांनंतर हिरव्या पालेभाजीचा रस, फळाचा रस चालू केला नाही तर बाळाला ‘क’ जीवनसत्त्व कमी पडू लागते.

लक्षणे व रोगनिदान –

– सुरुवातीला रोगप्रतिबंधक शक्ती कमी होते व रक्तपांढरीची लक्षणे दिसू लागतात. (रक्तवाढीसाठी लोह, ‘ब’ जीवनसत्त्व, ‘क’ जीवनसत्त्व आणि प्रथिने यांची गरज असते.

– ‘क’ जीवनसत्त्वाचा अभाव जास्त झाल्यास हाडांना सूज येते व ही हाडे दुखू लागतात. त्यामुळे उचलून घ्यायला गेले तर मूल रडते. छातीच्या फासळयांना मध्यरेषेजवळ दुखरेपणा असतो. सांधे दुखतात, हिरडया सुजतात व त्यांतून रक्त येते.

उपचार –

– ‘क’ जीवनसत्त्वासाठी लिंबू, संत्रे, मोसंबी, आवळा, इत्यादी फळे उपयुक्त आहेत. ‘क’जीवनसत्त्वाच्या गोळयाही मिळतात. जर वाढलेल्या आजारात उपचार सुरू केले तर दिवसातून 2 ते 3 गोळया ५\ दिवस द्याव्यात.

९) रक्तपांढरी (ऍनिमिया) –

– भारत म्हणजे सर्वाधिक रक्तपांढरीचा देश झाला आहे. शालापूर्व वयोगटात 60% मुले रक्तपांढरी ग्रस्त असतात. रक्तपांढरी म्हणजे रक्ताचा फिकटपणा. रक्ताचे मुख्य घटक म्हणजे तांबडया व पांढ- या रक्तपेशी.

– या सर्व पेशी द्रवपदार्थात तरंगत असतात. रक्ताचा लालपणा,त्याची प्राणवायू सर्व शरीरात पोहोचवण्याची क्षमता ही तांबडया रक्तपेशींवर अवलंबून असते. तांबडया रक्तपेशींचा लालपणा हिमोग्लोबीन नावाच्या रक्तद्रव्यामुळे असतो.

– हिमोग्लोबीन तयार होण्यासाठी लोह, प्रथिने, ‘ब’आणि ‘क’ जीवनसत्त्वे यांची गरज असते. त्यामुळे या घटकांची अन्नामधील कमतरता (उदा. निकृष्ट किंवा अपुरे अन्न) हे रक्तपांढरीचे प्रमुख कारण आहे.

– बाळाच्या शरीरात साधारण सहा महिने पुरेल इतका लोह खनिजाचा साठा असतो. यामुळे मुलांना सहा महिन्यांपर्यंत सहसा रक्तपांढरी होत नाही. दूध हे पूर्ण अन्न असेल तरी त्यात लोहक्षार व ‘क’ जीवनसत्त्व अगदी कमी असतात.

– त्यामुळे पहिले सहा महिने मुलांच्या शरीरातील लोहक्षारांचा साठा रक्तपेशी तयार करण्यासाठी वापरला जातो. सहा महिन्यांनंतर जर वरचे अन्न सुरू केले नाही तर लोहक्षार व जीवनसत्त्वांची कमतरता पडून रक्तपांढरी होते.

रक्तपांढरीची लक्षणे –

– रक्तपांढरीग्रस्त मूल माती खाते, भूक मंदावते. चेहरा फिका, डोळे (पापणीची आतील बाजू) फिके पांढरे, नखांवर पांढरेपणा आढळतो.

– सिकलपेशी व थॅलॅसीमिया या विकारांत पाणथरी (पांथरी) व यकृत हे अवयव मोठे आणि निबर लागतात.

– रक्तपांढरीमुळे मूल वारंवार आजारी पडते.

प्रतिबंधक उपाय –

– मुलाला चार महिन्यांनंतर वरचे अन्न (पूरक) सुरू करावे. गरोदरपणात आईने फेरस (लोहक्षार) गोळया खाणे गरजेचे असते. आहारात हिरव्या भाज्या, जमेल ते फळ, शक्य असल्यास प्राणिज पदार्थ (उदा. अंडी, मासे, मटण) शक्य तेवढे असावेत. जेवणात लिंबू असावा. जेवणानंतरच चहा घेऊ नये.

उपचार –

आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, अंडी, मांसाहारी पदार्थ वाढवणे.

– लोहक्षारांचे पातळ औषध, छोटया गोळया मिळतात. एक वर्षाच्या आत फेरसचे पातळ औषध, एक चमचा, रोज एकदा असे तीन महिने द्यावे. एक वर्षापुढे रोज एक गोळी तीन महिने द्यावी.

– स्वच्छता, पुरेसा योग्य आहार, रोगप्रतिबंधक लसटोचणी, नियमित तपासणी व आजारांमध्ये त्त्वरित योग्य उपचार हे मुलांना निरोगी ठेवण्याचे मुख्य उपाय आहेत.

– कोणतीही खेळणी तुम्ही घ्या त्यांचा दर्जा हा उत्त्मच असायला हवा. टेडी बिअर आणि त्या प्रकारातील इतर खेळणी चांगली नसतील तर अशा प्रकारच्या खेळण्यामधून स्पाँज, कापूस, फर बाहेर पडते. जी लहान मुलांच्या तोंडात व नाकात जाऊ शकते.

– ज्यामुळे मुलांना ॲलर्जी होण्याची शक्यता असते. टेडी बिअर प्रकारातील खेळण्याची स्वच्छता नियमीत अंतराने करने गरजेचे असते.

– काही खेळण्यांना खुर टोकदार काट व कोपरे असतात जे मुलांच्या तोंडाला, हाताला व शरीराच्या इतर भागांना इजा/दुखापत करु शकतात किंवा होण्याची शक्यता असते. कांही खेळणी ही वेगवेगळया लहान छोटया सुटया भागांनी एकत्रीत केलेली असतात.

– एखादा छोटा सुट्टा भाग लहान मुले खेळतांना तोंडात घालू शकतात व गिळू ही शकतात अशा वेळेस आपली कटाक्ष्‍ नजर त्यांच्यावर असणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या सर्व घटना दुर्घटना घडू नये म्हणून आपण काळजी घ्यावी.

Leave a Comment