कम्प्युटर, मोबाईलमुळे डोळ्यांना त्रास आणि काळजी

१. कम्प्युटर आणि मोबाईल आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचं एक महत्त्वाचं अंग बनलेला आहे. आता घराघरात त्याच एक बळकट आणि अबाधित स्थान आहे. हल्ली सगळ्यांचेच डोळे कुठल्या ना कुठल्या स्क्रीनला खिळून असतात. त्यामुळे डोळे आणि कम्प्युटर यांचं नातं समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आजकाल जवळ जवळ सर्वच क्षेत्रातल्या लोकांना कम्प्युटरवर दिवसातले ८-१० तास काम करण्याची सवय झालेली आहे.

२. जास्त कम्प्युटर वापरल्याने डोळ्याची आग होणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळे थकणे, डोकं आणि डोळे दुखणे, डोळे कोरडे पडणे असा अनुभव बर्याळच लोकांना येतो. यापैकी काहीही त्रास होत असल्यास डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. एकाच अंतरावर बऱ्याच वेळ नजर स्थिर ठेवणे आणि बराच वेळ डोळ्यांची उघडझाप न होणे हे मुख्य प्रश्नअ आपल्याला या ठिकाणी सोडवायचे आहेत.

३. आपण जर खुर्चीवर एकाच जागी दिवसांतून दहा तास बसून राहिलो तर पायाचे स्नायू तक्रार करतात. पाय अवघडतात आणि दुखायला लागतात. मात्र सलग दहा तास एके ठिकाणी न बसता आपण जर अधूनमधून उठलो, थोडे चाललो तर स्नायू अवघडत नाहीत. दुखतही नाहीत.

४. डोळ्यांचंही तसंच आहे. स्क्रीनवर सलग बरेच तास नजर खिळवून ठेवली तर डोळ्यांचे स्नायू अवघडतात. तक्रार करतात, डोळे दुखू लागतात. डोळ्यावर एक प्रकारचा ताण वाटू लागतो. एकाच जागी अनेक तास नजर स्थिर ठेवणे हे डोळ्यांच्या दृष्टीने अतिशय अनैसर्गिक काम आहे.

५. हे टाळण्यासाठी दर २०-३० मिनिटांनी नजर स्क्रीनपासून हटवावी आणि वेगवेगळ्या अंतरावरच्या वस्तू बघाव्यात. उदा. खिडकी, लांबचं झाड, भिंतीवरचं कॅलेंडर इ. त्यामुळे हालचाल होते आणि ते लवचिक राहतात.

६. स्क्रीनकडे एकटक बघितल्यास डोळ्यांची उघडझाप नेहमीपेक्षा कमी होते. त्यामुळे डोळ्यांच्या पृष्ठभागावरचा अश्रूचा थर पातळ होतो. त्याने नेहमीपेक्षा जास्त बाष्पीभवन होते. अश्रूंचे एरवीही बाष्पीभवन होत असले तरी आपल्याला त्रास होत नाही.

७. कारण आपली नियमितपणे एका मिनिटाला १० ते १२ वेळा पापण्यांची उघडझाप होत असते. प्रत्येक वेळा डोळे बंद करताना ब्रशने रंग पसरवावा त्याचप्रमाणे डोळ्यावर अश्रूचा पातळ थर पसरवला जातो.

८. कम्प्युटरवर नजर स्थिर राहत असल्यामुळे अश्रूचा थर पसरवण्याची क्रिया पुरेशी होत नाही आणि डोळे कोरडे पडतात. हे टाळण्यासाठी नियमितपणे डोळ्यांची उघडझाप करणे आवश्यक आहे. तरीही डोळे कोरडे वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Leave a Comment