जीभेवरून ओळखा शरीरातील समस्यांचे संकेत

१. जीभ आपल्या तोंडातील एक अत्यंत महत्वाचा अवयव आहे.जीभेमुळे आपण चाटणे,चव घेणे,गिळणे व बोलणे या सर्व क्रिया करु शकतो.रोज सकाळी दात घासल्यानंतर आपण जीभ स्वच्छ करतो.पण निरोगी आयुष्यासाठी आपण आपल्या जीभेचे नीट निरीक्षण करणे देखील आवश्यक असते.

२. जीभेकडे दुर्लक्ष केल्यास अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.जीभेत होणा-या बदलांवरुन आपण या समस्या जाणून घेऊ शकतो.जीभवर जाणवणारे बदल कधीकधी अतिसुक्ष्म असल्याने आपल्या सहज लक्षात येत नाहीत.

३. जीभेत होणारे हे विशेष बदल आणि त्यामुळे होणा-या समस्या :

४. जीभेच्या रंगात बदल होणे :

– सामान्यत: निरोगी माणसाची जीभ गुलाबी रंगाची असते व जीभेवर छोटे छोटे उंचवटे असल्याने थोडी खडबडीत असते. मात्र आरोग्याबाबत काही समस्या निर्माण झाल्यास तुमच्या जीभेचा रंग बदलतो. जीभेचा दाह होत असेल, इनफेक्शन झाले असेल किंवा तुमच्या शरीरात फॉलिक एसिड किंवा विटामिन बी १२ ची कमतरता असेल तर तुमची जीभ लाल रंगाची दिसू लागते. या समस्येवर डॉक्टर तुम्हाला फॉलिक एसिड वाढवण्यासाठी संतुलित आहार व फॉलिक एसिडच्या गोळ्या तसेच विटामिन बी१२ वाढवण्यासाठी विटामिनयुक्त गोळ्या, इंजेक्शन्स आणि विटामिन बी १२ असलेले पदार्थ आहारात वाढवण्याचा सल्ला देतात.

– सुजलेल्या किंवा लालसर जीभेच्या लक्षणाला स्टॉबेरी टंग असे म्हणतात. हे तापाचे लक्षण असू शकते एन्टीबायोटीक्स घेतल्याने ही समस्या दूर होते. कधी कधी जीभेवर वेगवेगळ्या ठिकाणी पांढरे डाग दिसतात. जे आठवड्या भराने निघून जातात. या समस्येला जिओग्राफिक टंग असे म्हणतात.

– अन्नपदार्थ खाल्यानंतर स्वच्छता न राखल्यास विषाणूंमुळे जीभ पांढरी दिसू लागते. यासाठी नियमित टंग स्क्रॅपरने जीभ स्वच्छ करा.मद्यपान,धुम्रपान किंवा डिहायड्रेशन मुळे देखील ही समस्या निर्माण होते. यासाठी व्यसनांपासून दूर रहा.

– काहीवेळा इनफेक्शन व उष्णतेमुळे जीभ पांढरी होते. याचे कारण तंबाखूचे सेवन, चुकीची दंतरचना, चुकीच्या मापाची कवळी किंवा अशी अनेक कारणे असू शकतात. अशी समस्या आढळल्यास त्याबाबत दंतवैज्ञाचा सल्ला जरुर घ्या.

– जर तुमच्या त्वचेवर पांढरा थर जमा होत असेल व नुसत्या स्पर्शादेखील त्यातून रक्त येत असेल तर हे फंगल इनफेक्शन असू शकते या समस्येला ट्रश (thrush) असे म्हणतात. या इनफेक्शनचा त्रास तोंडासोबत शरीरातील इतर अवयवांना देखील होऊ शकतो.डेंटीस्टच्या सल्ल्यानूसार घेतलेल्या एन्टीफंगल औषधांनी ही समस्या दूर होते.

– जर तुमच्या जीभेवर पांढरे डाग असतील आणि जीभ घासल्याने किंवा तोंड स्वच्छ धुतल्याने ते कमी होत नसतील तर कृपया याबाबत त्वरीत तुमच्या दंतवैद्याचा सल्ला घ्या. तोंडातील आतील भागात जळजळ होत असेल तर ते (leukoplakia) लुकोप्लेकीया चे लक्षण असू शकते. लुकोप्लेकीया ही कर्करोग होण्यापुर्वीची समस्या आहे.ओरल कॅन्सर टाळण्यासाठी अशी लक्षणे दिसताच ताबडतोब तुमच्या दंतवैद्याकडून तपासणी करु घ्या.

– जीभेवर पांढरे चट्टे किंवा रेषा lichen planus या त्वचा रोगाचे लक्षण असू शकते.ही समस्या वारंवार दिसून येऊ शकते.यावर कोणतीही उपाययोजना उपलब्ध नाही. मात्र एन्टीसेफ्टीक माऊथवॉश किंवा स्टिरॉईड स्प्रे मुळे तुम्हाला या समस्येतून आराम मिळू शकते.एका संशोधनानूसार हळदीच्या मलमाचा दिवसातून दोनदा वापर केल्याने याबाबतीत चांगला फायदा दिसून आला आहे.

५. जीभेच्या पृष्ठभागावर होणारे बदल :

– जीभेवर असलेल्या चवीचे ज्ञान प्राप्त करुन देणा-या हजारो उंचवट्यांमुळे जीभ खडबडीत दिसते. तुम्ही निरोगी आहात का हे या पुष्ठभागाच्या लक्षणांवरुन समजू शकते. अती धुम्रपान करणा-या लोकांच्या जीभेवरील पुष्ठभागात बदल होतात. तसेच बराच काळ एन्टीबायोटीक्स घेतल्यानेही हा पृष्ठभाग बदलतो.अशा लोकांच्या जीभेवर जाड गढद चट्टा दिसू लागतो. तसेच जीभवरील उंचवटे वाढल्याने जीभ जास्त खरखरीत दिसू लागते. ज्या जीभेला हेअरी टंग(hairy tongue) असेही म्हणतात.

– जीभवरील उंचवटे कमी झाल्याने जर ती गुळगुळीत झाली असेल तर त्या व्यक्तीला अशक्तपणा, जीवनसत्वांच्या कमातरतेमुळे होणारे विकार किंवा इतर समस्या असू शकतात.

६. जीभेला भेगा पडणे :

– जीभेच्या पृष्ठभागावर छोट्या छोट्या भेगा पडत असल्याचे सामान्य लक्षण ब-याचदा दिसून येते.वयोमानानूसार यात वाढ झाल्यास अन्न कण त्यात अडकून तोंडाला दुर्गंधी येणास सुरुवात होते.यासाठी नियमित तोंडाच्या स्वछतेची निगा राखा व जीभ स्वच्छ करण्यास विसरु नका.

– जर तुम्हाला या समस्येमध्ये तोंड,ओठ किंवा चेह-याच्या इतर भागात सूज आढळून आली तर त्वरीत तुमच्या डॉक्टरांना याबाबत सांगा कारण हे Melkersson-Rosenthal या एका दुर्मिळ आजाराचे लक्षण असू शकते.

७. जीभेवर सूज येणे :

– इनफेक्शन अथवा अ‍ॅलर्जीमुळे तुमच्या जीभेला सूज अथवा जळजळ होऊ शकते.जर तुम्हाला एखादा पदार्थ,औषध किंवा किटकदंशाची एलर्जी असेल तर तुमच्या जीभेला सूज येते.

– angioedema या समस्येमध्येही जीभेखाली सूज येते.amyloidosis, pellagra किंवा myxedema या समस्येमध्ये हळूहळू जीभेखील सूज दिसून येते.

८. जीभेला फोड येणे :

– जीभेला फोड आल्यास काळजी करण्याचे काहीच कारण नाही मात्र त्याचा त्रास जरुर होतो. जीभ चावणे, ताण-तणाव, स्मोकींग, अन्नातील बदल अथवा हॉर्मोन्समधील बदलामुळे ही समस्या निर्माण होते.

– एखाद्या गंभीर इनफेक्शनमध्ये किंवा हात,पाय आणि तोंडांच्या विकारांमध्ये जीभेवर फोड येतात.मात्र एक किंवा दोन आठवड्यांमध्ये हा त्रास आपोआप कमी होतो.यासाठी मीठाच्या पाण्याच्या गुळण्या करा,तोंडामध्ये दुख-या भागात बर्फाचा खडा ठेवा किंवा माऊसवॉश किंवा जेलने आराम तुम्हाला मिळू शकतो.यात काळजी करण्याचे काहीच कारण नाही मात्र जास्त त्रास होत असेल तर दंतवैद्याकडून तपासणी करुन घ्या.

९. जीभेची चव जाणे :

– कधीकधी तोंडाची चव जाते किंवा एखाद्या पदार्थांची चव नीट ओळखता येत नाही. कधीकधी वैद्यकीय उपचार अथवा औषधांमुळे असे घडू शकते.वाढते वयोमान किंवा इनफेक्शन मुळे जीभेवरील टेस्टबड्स कमी होतात.

– तोंडातील कोरडेपणा, केमोथेरपी, कवळी लावणे, डेंटल सर्जरी, औषधे घेणे, स्मोकींग, मद्यपान, शरीरात झिंकची कमतरता,तोंडाची अस्वच्छता अशा अनेक कारणांमुळे चवीचे ज्ञान होण्याची क्षमता कमी होते. यावर कोणतीही उपाययोजना करता येत नाही. औषध उपचार थांबवल्यानंतर, तसेच आहारात झिंकचे प्रमाण वाढल्यानंतर तुम्हाला पुन्हा चवीचे ज्ञान घेता येते.

– कृत्रिम रित्या लाळ निर्माण करुन अथवा शुगर-फ्री गोळ्या तोंडात ठेवल्याने तोंड कोरडे होण्याची समस्या दूर होते.

१०. जीभेत वेदना होणे :

– जीभेत होणा-या वेदनेमुळे खाणे, पाणी, पिणे, दात घासणे, बोलणे या क्रिया करताना खुप त्रास होतो. अचानक जीभ चावली गेल्याने ब-याचदा जीभेतून वेदना होतात.जीभेला फोड आल्याने जीभेला वेदना होतात. तसेच अशक्तपणा, जीवनसत्वांची कमतरता, जठराचे विकार, तोंड कोरडे होणे, कृत्रिम दात लावणे, हायपोथायरॉईझम किंवा इतर काही मानसिक समस्यांमुळे जीभेत वेदना, जळजळ, खाज येते.

– कधीकधी विचित्र दंत रचना किंवा टॉन्सिल्समुळेही जीभ दुखते.मेनोपॉजनंतर कधीकधी महीलांना बर्निंग टंग सिन्ड्रोमचा त्रास जाणवतो. जीभेच्या कर्करोगामध्ये शेवटच्या टप्प्यात जीभेच्या वेदना असह्य होतात.यामुळे समस्या काय आहे हे समजल्यास उपचार करणे सोपे जाऊ शकते.

– जीभेवर फोड आल्याने जीभ दुखत असेल तर मीठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्याने किंवा बर्फ ठेवल्याने आराम मिळतो.

११. जीभ बांधलेली असणे – Tongue-tie :

– याप्रकारामुळे जीभेची हालचाल करणे देखील कठीण होते. याला Ankyloglossia असे म्हणतात ज्यामुळे खाणे तसेच बोलणे शक्य होत नाही.

– जन्मत: तान्हा बाळामध्ये अशी समस्या असल्यास त्याला स्तनपान करता येत नाही. काही परिस्थितीत ही समस्या नैसर्गिक रित्या बरी होते मात्र ब-याचदा यासाठी सर्जरी करावी लागते.

– नॉर्मल व्यक्तीची जीभ अचानक बांधली गेल्यास ते मज्जासंस्था अथवा मेंदूला झालेल्या गंभीर इजेचे, इनफेक्शनचे लक्षण असू शकते.

१२. मायक्रोग्लॉसिया किंवा तोकडी जीभ :

– या प्रकारात जीभ प्रमाणापेक्षा लहान असते.विशेषत: जर तान्हा बाळामध्ये जीभ नसणे अथवा ती आकाराने लहान असणे अशी समस्या आढळल्यास त्याला खाणे किंवा बोलणे शक्य होत नाही. पण असे होणे अतिशय दुर्मिळ आहे.

१३. मेक्रोग्लॉसिया किंवा मोठी जीभ :

– काही गंभीर आजारातील विकृतीमुळे जीभेतील स्नायूंची अवास्तव वाढ होते.हे कर्करोग किंवा इतर गंभीर आजारांचे लक्षण असू शकते. अशा मोठ्या आकाराच्या जीभेमुळे झोपताना श्वास घेणे कठीण होते. अशा परिस्थितीत दातांवर दाब आल्याने त्यांची रचना बदलते.जीभेचा आकार प्रमाणात असल्यास उपचार करण्याची गरज नाही मात्र प्रमाणाबाहेर असल्यास सर्जरी करणे आवश्यक असते.

१४. जीभ फाटलेली असणे – Cleft tongue :

– अशी जीभ दुभंगलेली असते.त्यामुळे जीभेचे दोन भाग होतात.जन्मापासून अशी जीभ असू शकते.जीभेचा पुर्ण विकास न झाल्याने अशी जीभ निर्माण होते.अशा जीभेमध्ये अन्नपदार्थ व जीवजंतू अडकण्याची शक्यता असते.

Leave a Comment