दात निरोगी ठेवण्यासाठी खबरदारी व उपाय

१. दर वर्षी दंतचिकित्सा करून घ्यावी. शक्‍यतो ही चिकित्सा एकाच दंतवैद्यकाकडून करून घ्यावी.

२. दात दुखायला लागले म्हणजे दातांचे जास्त नुकसान झालेले असते. यामध्ये दातामधील मांसल किंवा जिवंत भाग दुखावलेला असतो; त्यामुळे उपचारपद्धतींमध्ये मर्यादा येतात. वेळीच काम करून घेतले, तर उपचारपद्धतीचा फायदा पुढे अनेक वर्षे मिळतो.

३. सकाळी उठल्यावर व झोपण्यापूर्वी दात ब्रशनेच घासणे अपेक्षित आहे.

४. दात बोटांनी साफ केल्यास दोन दातांच्या फटीमध्ये अन्नकण ढकलले जातात व त्यामुळे हिरड्यांचे विकार बळावतात. ब्रशने अन्नकण निघून जातात.

५. रात्री झोपण्यापूर्वी दात घासल्यामुळे दातामध्ये अन्नकण अडकून रात्रभर कुजत नाहीत. त्यामुळे दातांचे व हिरड्यांचे आरोग्य राखले जाते व हृदयविकारदेखील बळावत नाही.

६. ब्रशने कधीही दात आडवे घासू नयेत. त्याने दात हिरडीच्या जवळ झिजत जातात व हिरड्यांना इजा पोचते; तसेच दात चांगले स्वच्छही होत नाहीत.

७. दात ब्रशने गोलाकार पद्धतीने व हिरडीतून दाताकडे अशा पद्धतीने घासावेत.

८. अंगठा किंवा बोटे तोंडात चोखल्यामुळे वरच्या जबड्याचा आकार बदलत जातो व तो बाहेर येतो; पण दातांना तारा बसवून दात सरळ रेषेत आणता येतात.

९. ओठ चावण्याच्या सवयीमुळेदेखील खालच्या जबड्याची वाढ खुंटते व पर्यायाने येणारे दात वेडेवाकडे येत जातात.

१०. काहींना जिभेने दात पुढे ढकलण्याची अनेक वर्षे सवय असते. त्यामुळे समोरचे दात बाहेर ढकलले जातात किंवा अनुवांशिकतेमुळे देखील जबड्याचा आकार मोठा व विचित्र असू शकतो.

Leave a Comment