महिलांना कानाचे सौदर्य खुलविण्यासाठी अलंकार

१. कर्णफूल : कानामध्ये खाली पाळीच्या भोकात अडकवण्याचा हा रत्न व मोतीजडित असा फुलाच्या (कमळाच्या) रूपाकाराचा कुडी या अलंकाराचाच एक वैभवशाली प्रकार.

२. काप-काप याचा अर्थ तुकडा. एक काप रत्नजडित असा चंद्रकोरीच्या आकाराचा असून त्याला मोत्यांचे वेल (सर) जोडलेले होते, तर दुसरा काप नुसता सोन्याचा वाटोळा दाणा असून त्याला कुडय़ांप्रमाणेच खाली मळसूत्राचा जोड असतो. मराठी भाषेत ‘काप गेले पण भोके राहिली’ अशी जी म्हण आहे ती या कापाच्या संदर्भात खरी वाटते.

३. कुर्डु : हा लहानसा कुडीचाच एक प्रकार, परंतु कानाच्या पाळीवर मध्यभागी घालण्याची प्रथा होती. ‘लहानशी कुडी’ या अर्थानेही. या दागिन्याला ‘कुर्डु’ हे नाव मिळाले असावे.

४. खुंट :हासुद्धा एक छोटा अलंकार अधूनमधून कुर्डुऐवजी कानाच्या पाळीवर कुर्डुच्याच जागी घातला जातो. याला ‘खुंटबाळी’ असा दुसराही शब्द वापरात आहे.

५. गाठा : हा सुवर्णाचा एक देखणा अलंकार. कोकणामध्ये कोळी जमातीच्या स्त्रियांच्या वापरात आहे. त्याशिवाय ‘गाठा’ या नावाचा दुसराही छोटासा अलंकार मत्स्य प्रतीक म्हणून या जमातीत लग्नप्रसंगी घातला जातो. तो जणू काही ‘सौभाग्यचिन्ह’ असल्याचा महत्त्वाचा मानला जातो.

६. चौकी किंवा चौकडा : चारच मोती किंवा चार सोन्याचे दाणे असणारा हा कुडीचाच एक प्रकार चौकी-चौकडा या नावाने ओळखला जातो.

७. भोकर : हा कानातील एक लोंबता अलंकार आहे. तो सुटाच वापरला जातो किंवा त्याला मोत्याचा वेल जडवून त्यासह तो कानात घातला जातो.

८. मुडकी अथवा मुरकी : चंद्रकोरीच्या आकाराचा हा कुडीच्या स्वरूपातला अलंकार कानात त्याचप्रमाणे नाकातही घातला जातो. वर नाकातील अलंकारांच्या माहितीत हे नवे नाव दिले आहेच.

९. लवंग : हा काही वेगळा खास अलंकार नव्हे, तर अलंकाराऐवजी पर्यायी वापरासाठी केलेला हा छोटासा दागिना आहे. मुख्यत: नाक आणि कान यांची भोके बुजून जाऊ नयेत या हेतूने त्या भोकांमध्ये लवंगेच्या रूपाकाराची एक सोन्याची अथवा चांदीची काडी घालून ठेवतात तिला ‘लवंग’ असे म्हटले जाते.

Leave a Comment