स्वरयंत्रणा आणि घसा

१. अगदी सर्दीपासून ते भयानक कॅन्सरपर्यंत अनेक विकार स्वरयंत्रणा व घसा येथे होऊ शकतात.

२. कोणत्याही प्रकारचे तंबाखूचे सेवन, प्रदूषण, काही प्रकारची औषधे, पित्ताचे विकार इत्यादी गोष्टींमुळे स्वरयंत्रणा व घसा यांचे अनेक प्रकारचे विकार, बिघाड व रोग होऊ शकतात.

३. आवाज बसणे, कोरडा खोकला येणे, गिळण्यास अडचण जाणवणे, घटसर्प होणे अशा तक्रारी 4 ते 5 आठवडे किंवा जास्त काळ त्रास देत असतील, तर ताबडतोब वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे.

४. आपल्या श्‍वासनलिकेच्या वरच्या भागावर अन्ननलिकेच्या पुढे स्वरयंत्रणा असते. या यंत्रणेमुळे आपण बोलू शकतो, गाऊ शकतो वा विविध ध्वनी निर्माण करू शकतो. याशिवाय, चावून झाल्यावर अन्न गिळताना ते अजिबात श्‍वासनलिकेत जाऊ नये याची खबरदारी घेण्याचे कार्य ही यंत्रणा करते. नाही तर लगेचच ठसका लागू शकतो व तो भयानक स्वरूप धारण करू शकतो.

५. अन्नाला श्‍वासनलिकेत जाताना ‘no entry’चे कार्य एपिग्लॉटिस नावाच्या पडदेवजा अवयवाचे असते. ही यंत्रणा आयुष्यभर आपले कार्य करीत असते; तसेच मूल जन्मण्याच्या वेळेला पूर्णपणे आपले कार्य चालू करते. तसे नाही झाले तर मातेचे दूध सर्वप्रथम पितानाच ठसका लागला असता अथवा श्‍वास गुदमरला असता.

६. जर कदाचित अन्नाचा मोठा घास अडकला तर श्‍वासनलिका बंद होऊ शकते. असे काही सेकंद जरी झाले तरी अशा व्यक्तीचा प्राणवायूचा पुरवठा बंद होऊ शकतो, भानदेखील हरपून बेशुद्धावस्था येऊ शकते; आणि प्राण गमावण्याचीदेखील वेळ येऊ शकते. अशा व्यक्तीला उभ्या स्थितीत मागून पोटावर दाब देऊन हा मार्ग मोकळा करणे आवश्‍यक असते.

७. मदत करणाऱ्या व्यक्तीने श्‍वास अडकलेल्या व्यक्तीच्या पाठीमागे उभे राहावे. लहान मुलांना किंवा बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीची शरीराची स्थिती आडवी ठेवावी.

– घ्यावयाची दक्षता व लक्षणे जाणणे :

८. आपल्या श्‍वासनलिकेत अन्नाचा घास अथवा कण जाणे हे टाळणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच इतर प्रवाही पदार्थ घशातून उलटे फिरून नाकात न जाणे हेही आवश्‍यक आहे. हे कार्य आपली पडजीभ किंवा युव्हिला करते.

९. कोणत्याही कारणाने आपल्या पडजीभेचे कार्य नीट न झाल्यास पाणी पिताना ठसका लागण्याऐवजी ते नाकातून बाहेर येऊ शकते.

१०. स्वरयंत्रणेतील रचनात्मक बदलांमुळे “मुलांचा आवाज फुटतो’ म्हणजे त्यात “पुरुषी’पणा जाणवू लागतो, आवाजामध्ये दमदारपणा येतो. हा बदल पुरुषत्वास जबाबदार असणाऱ्या टेस्टेस्टेरॉन या संप्रेरकामुळे घडवून आणला जातो.

११. इतर ध्वनींप्रमाणे आपल्या वैखरी वाचेचा उगम आपल्या स्वरयंत्रणेतून होतो. मोठ्याने स्पष्ट उच्चार करीत भाषेचा वापर करणे ही क्रिया स्वरयंत्रणा, जीभ, ओठ, दात, गाल यांच्या एकत्रित कार्याने साधलेली असते.

१२. स्वरयंत्रणा व घसा यांची काळजी घेणे अत्यंत आवश्‍यक आहे. त्यासाठी अतितेलकट – तिखट खाणे टाळावे, धूम्रपान किंवा कोणत्याही प्रकारचे तंबाखूचे सेवन करू नये, घसा ताणून बोलू नये, पित्ताचा त्रास होत असल्यास आयुर्वेदिक उपचारपद्धती घ्यावी, घट्ट शर्ट किंवा नेक टाय वापरू नये. प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी प्राणायाम, जलनेती नेहमी करावी. अतिशीतल वा गरम पदार्थ खाऊ नयेत. स्वरयंत्रणा व घसा यांनादेखील (जागेपणी) विश्रांतीची गरज असते.

Leave a Comment