कानाचे आरोग्य

डोळ्याप्रमाणे कान हा देखील आपल्या शरीराचा नाजूक अवयव असून डोळ्या इतकाच कान हा ही महत्त्वाचा अवयव आहे. लहान मुलांच्या कानाची अधिक काळजी घ्यावी लागत असते. कारण मोठ्या व्यक्तीपेक्षा लहान मुलांच्या कानातील पडदा हा पातळ असतो.

१. ऐकूनच माणसाला बोलता येतं या तत्वानुसार कानाने ऐकताच न येणाऱ्या व्यक्तींना मुकेपणा नसतानाही बोलणं शक्य होत नाही. कानाच्या निष्क्रियतेमुळे श्रवण आणि त्यामुळे इतरांशी संवाद अशक्य होतो. परिणामी व्यक्तीचा जगाशी संपर्क तुटल्यासारखी परिस्थिती निर्माण होते.

२. कान निष्क्रीय असतील तर चारी बाजूंनी वेढलेल्या पण एकाकी बेटासारखी व्यक्तीची अवस्था होते. म्हणूनच कानाची काळजी घेणं खूप गरजेचं असतं.

३. हल्लीच्या धकाधकीच्या आणि प्रदूषणाने वेढलेल्या परिस्थितीत कानासारख्या इंद्रियांची काळजी क्रमप्राप्त ठरते. घामाच्या धारा वहायला लावणाऱ्या उन्हाळ्यासह थंडी आणि पावसाळ्यातही कानांची खास काळजी घेणं गरजेचं असतं.

४. कानात अडकवलेली डुलं आपल्याला मनमोहक वाटतात मात्र बाहेरून दिसणारा कान आतमध्येही खूप गहन असतो. मुख्यत: बाह्यकर्ण, मध्यकर्ण आणि अंतर्कर्ण अशा तीन भागांत कानाचे वर्गीकरण केले जाते.

५. बाह्यकर्ण – बाह्यकर्णाची रचना बाहेर पसरट आणि आत नळीप्रमाणे अरुंद होत जाणारी असते. बाह्यकर्णाच्यात्वचेतून तेलकट पदार्थ पाझरतो. त्यामुळे हा भाग कोमल, मऊ आणि नाजूक राहतो.

६. मध्यकर्ण – मध्यकर्ण म्हणजे हाडामधील एक छोटीशी पोकळी असते. जिच्या एका बाजूला कानाचा पडदा असतो आणि दुस-या बाजूला अंतर्कर्णाचा शंख असतो.

७. अंतर्कर्ण – अंतर्कर्ण म्हणजे हाडांच्या पोकळीतला नाजूक शंख. ध्वनिलहरींचा संदेश चेतातंतूंच्या माध्यमातून मेंदूपर्यंत पोहचवणे हे या शंखाचे मुख्य काम होय. अंतकर्णाचे दुसरे महत्त्वाचे शरीराचा तोल सांभाळणे.

८. अंतर्कर्णातील एका विशिष्ट भागात द्रवपदार्थ असतो. या द्रवपदार्थात शरीराचा तोल सांभाळण्यास मदत करणाऱ्या पेशी असतात. या पेशींची रचना आश्चर्यकारक असते. मात्र या पेशींमध्ये असंबंध हालचाली झाल्यास शरीराचा तोल जातो.

९. कानचे कार्य हे महत्त्वाचे असल्याने त्याची योग्य निगा आणि काळजी घेण गरजेचं असतं. आजार होण्याआधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि सजगता क्रमपाप्त ठरत असते.

१०. सतत मोठ्या आवाजात काम करणं, फटाके, जास्त आवाजाच्या गाड्या चालवणे तसेच सतत फोन किंवा मोबाईलवर बोलत राहणे, वॉकमन, आयपॅड, मोबाईलचे इयरफोन कानाला लाऊन मोठ्या आवाजात गाणी ऐकणे, स्टेशनवर ट्रेनच्या कर्णकर्कश आवाज सतत कानावर पडणे आदी गोष्टींमुळे कानाची श्रवणक्षमता उत्तरोत्तर कमी होत जाते.

११. श्रवणक्षमता कमी होण्याचं पहिलं लक्षण म्हणजे व्यक्ती मोठ्यानं बोलू लागते. अशावेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन लगेचच उपचार करून घ्यावेत. सतत मोठ्या आवाजात काम करणाऱ्यांनी किमान सहा महिन्यांतून एकदा कानाची तपासणी करून घ्यावी. मोठ्या आवाजात काम करणाऱ्यांनी कानात कापसाचे बोळे घालणे उत्तम.

१२. कानातला मळ काढण्यासाठी काही घरगुती उपायही उपयुक्त ठरतात. दोन ते तीन दिवस रात्री झोपताना कानात ग्लिसरीनचे दोन ते तीन थेंब टाकावेत किंवा दोन चमचे खोबरेल तेलात लसणाच्या दोन पाकळ्या टाकून लसून लाल होईपर्यंत गरम करून घ्यावं आणि हे मिश्रण थंड झाल्यावर कानात टाकावं. त्यामुळे कानातला मळ मऊ होण्यास मदत होते.

१३. त्याचप्रमाणे कानात हायड्रोजन पेरॉक्साईडचे दोन थेंब टाकले तरी कानातला मळ मऊ होतो. मऊ झालेला मळ अलगद काढून घ्यावा. मात्र कित्येकदा कानातला मळ कडक होऊन तो निघेणासा होतो. अशावेळी जबरदस्तीने मळ काढण्यापेक्षा डॉक्टरांकडून काढणं फायदेशीर ठरतं.

१४. कानातला मळ कडक होऊन खडा होऊ नये म्हणून आपल्याकडे कानात रोज तेल घालण्याची पद्धत आहे. मात्र रोज तेल घालण्याच्या सवयीमुळे कानात बुरशी होऊन जंतूसंसर्ग होण्याचा धोका असतो. म्हणून पंधरा ते वीस दिवसांतूनन कानात तेल घालावं.

१५. कानात मळ साचणेही कानाच्या आरोग्याला अपायकारक असते. उन्हाळ्यात घामाचे पाणी कानात जाण्यामुळे, धुळीचे कण तसेच अंघोळ करताना साबण कानात जाण्यामुळे कानात मळ साचतो. त्यामुळे कानाची स्वच्छता ठेवणं गरजेचं असतं. तसेच कानातला मळ वरचेवर साफ करणंही आवश्यक असतं. मात्र कान साफ करताना कान कोरणे, काडेपेटीतील काडी वापरणं कानासाठी घातक ठरू शकतं.

१६. कान साफ करण्‍यासाठी कान कोरणे, काडेपेटीतील काडी, बड्स वापरले जातात. त्यामुळे आपण कानातला मळ बाहेर काढण्यापेक्षा आत ढकलत असतो. कानाचा पडदा अतिशय नाजूक असतो. त्याला जरा जरी स्पर्श झाला तरी कान दुखतो. त्यामुळे कानाची स्वच्छता करण्यासाठी अशा वस्तू वापरू नयेत. कानात भरपूर मळ आला असल्यास ड्रॉप्स घालावेत.

१७. रस्त्यांवर कानातला मळ काढणाऱ्यांकडून मळ अजिबात काढू नये. कधी कधी कानात मळ साचल्याने कान चावतो किंवा आतून खाज आल्यासारखं वाटतं. अशावेळी हाताची बोटं, पेन किंवा पेन्सिल कानात घालण्याची सवय अनेकांना असते. मात्र असं केल्यानं कानाला इजा पोहचून कानात रक्तस्त्राव होऊ शकतो.

१८. पाण्यात पोहणाऱ्या व्यक्तींनी कानातलं पाणी काढणं गरजेचं असतं. कान व्यवस्थित साफ करून कान कोरडा ठेवणं गरजेचं असतं. कानात पाणी साचून राहिल्यानं कानात बुरशी होण्याची शक्यता असते. उन्हाळ्याच्या दिवसांत घामाच्या धारा कानात जाऊन मळ साचण्याची किंवा कानात बुरशी होण्याची शक्यता असते. त्यामुळे कान कोरडा राहील याची काळजी घ्यावी.

१९. पावसाळ्यातही कानात पाणी जाऊन कान ओला राहतो त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत कानाची विषेष काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीत कानाला मफलर किंवा उबदार कपडा बांधावा, कानात थंड हवा जाऊ न देण्याची काळजी घ्यावी. जोराचा वारा तसेच प्रवास करताना कानाला कपडा बांधावा. अशाप्रकारे कानांची काळजी घेतल्यास जगाला ऐकत राहण्यातला आनंद आपण आयुष्यभर घेऊ शकतो.

२०. काही कारणांमुळे कानांमध्ये फोड होतात. हे फोड पिकून जेव्हा फुटतात तेव्हा त्यातून पू बाहेर येऊ लागतो. कानातून पू बाहेर येऊ लागणे हे कानाचे आरोग्य बिघडल्याचे लक्षण समजले जाते.

२१. कडूलिंबाच्या तेलात मध घालून ते मिश्रण कापसाने कानाच्या पाळीवर लावावे. असे केल्याने कानातून पू बाहेर येणे थांबते. कडूलिंबाची पाने पाण्यात टाकून उकळून घ्या. या पाण्याने आपला कान साफ करून घ्या. असे केल्यानंतर दररोज कांद्याचा रस थेंबा थेंबाने कानात टाकावा. या उपचारानेही कानातून पू बाहेर येणे थांबते.

२२. मोहरीच्या तेलानेही कानातील पू थांबविता येतो. त्याकरिता 50 एम.एल. मोहरीचे तेल आणि 4 ग्रॅम मेण एकत्र करून भांड्यात गरम करावे. मेण जेव्हा वितळू लागते तेव्हा ते भांडे खाली उतरवावे आणि त्यात तुरटीची पूड घालावी. हे मिश्रण कानात घातल्यास कानातून पू बाहेर येणे थांबते.

२३. वार्‍यावर जाताना कान झाकावेत अथवा रूमाल बांधावा. गार वारा कानात गेल्यास तापमान कमी होऊन सायनसचा त्रास होण्याची भिती असते.

२४. स्त्रियांमध्ये कान दुखतो तो जास्त करून गार हवा सतत कानांना लागल्यामुळे, त्यामुळे पहाटे उठल्यावर विशेषतः थंडीच्या दिवसांत तरी कानाला रुमाल बांधावा. रोज गरम तव्यावर कापड गरम करून बाहेरून कानांना शेक द्यावा. लसणाच्या 2-3 पाकळ्या खोबरेल तेलात गुलाबी होईपर्यंत उकळाव्यात व तेल कोमट झाले की 2 थेंब घालावेत.

२५. उष्णता वाढून कानशिलांची आग होत असल्यास चंदन, ज्येष्ठ मध, अनंत मूळ पावडर एकत्र करून पाण्यात कालवून बाहेरून लेप लावावा. आहारातही तूप, दूध यांचे प्रमाण वाढवावे. काही वेळा कानावर फोड येतो. त्यावर चंदन उगाळून लावावे.

२६. पोटातही गुलकंद घ्यावा. ज्यामुळे उष्णता कमी होते. त्वरित तज्ज्ञ आयुर्वेद डॉक्‍टरांना दाखवून चिकित्सा सुरू करावी. बऱ्याचदा कानातून स्राव होतो. पाणी आहे की पू आहे हे प्रत्यक्ष तपासल्यावरच कळते. अशावेळी कानाच्या डॉक्‍टरांना लवकर दाखवून यावे.

२७. त्रिफळा गुग्गुळ, सूक्ष्म त्रिफळा या गोळ्या पाण्याबरोबर 2-3 प्रमाणात घ्याव्यात. या गोळ्यांनी वेदना कमी होतात आणि जंतुसंसर्ग वाढत नाही.

२८. कान फुटण्याची तक्रार असेल तर दही, आंबट ताक घेऊ नये. आहारात तिखट चमचमीत खाऊ नये. मिरचीचा कमी वापर करावा.

Leave a Comment