गरोदरपणातली तपासणी

गरोदरपणात खालील दिशांनी तपासणी करायची असते :

१) गरोदर मातेस काही आजार, दोष आहेत काय ?

२) गर्भाची वाढ नीट होते की नाही ?

३) बाळंतपण सुखरुप होईल की नाही ?

४) तपासणी :

*पहिल्या तिमाहीत निदान एकदा.

*दुस-या तिमाहीत म्हणजे चवथ्या, पाचव्या, सहाव्या महिन्यात निदान महिन्याला एकदा.

*तिस-या तिमाहीत म्हणजे सातव्या महिन्यापासून पुढे, पंधरवडयाला एकदा.

खास तपासण्या :

१) लघवीची तपासणी करावी. लघवीत साखर किंवा प्रथिने असल्यास धोक्याचा संभव असतो. लघवीची तपासणी प्रत्येक तपासणीच्या भेटीच्या वेळी करावी हे चांगले.

२) रक्तात रक्तद्रव्य पुरेसे आहे किंवा नाही हे तपासावे.

३) रक्ताचा गट माहित करून घेतला पाहिजे. कारण माता ऋण रक्तगटाची व पिता धन रक्तगटाचा असेल तर गर्भावर (विशेषतः दुस-या वेळच्या गर्भावर) प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. अशा प्रसंगी विशेष उपचार करावे लागतात. म्हणून रक्ताची एकदा तरी तपासणी करणे आवश्यक आहे.

४) रक्ताची ‘व्ही.डी.आर.एल’ सिफिलिस तपासणी करावी लागते.

५) रक्ताची एच.आय.व्ही / एड्ससाठी तपासणी जिल्हा व ग्रामीण रुग्णालयातच होते.

६) टॉर्च टेस्ट म्हणजेच टॉक्झोप्लाझ्मा, जर्मन गोवर, कांजिण्या व हार्पिस या चार विषाणू तापासाठी रक्ततपासणी केली जाते. हे चारही आजार गरोदरपणात घातक असतात.

७) सोनोग्राफी या तपासणीची कधीकधी गरज पडते. ही तपासणी करायची किंवा नाही हे अर्थात डॉक्टरकडूनच ठरते. गर्भाची जागा (गर्भाशयात किंवा अस्थानी), वारेची जागा, पिशवीच्या तोंडाची स्थिती, जुळे आहे का, काही प्रकारची व्यंगे, बाळाभोवतालचे पाणी, गर्भाशयातले दोष, इत्यादी अनेक गोष्टींची माहिती या तपासणीत मिळू शकते. यामुळे योग्यवेळी उपचार करणे सोपे होते.

८) क्ष-किरण तपासणी करणे गर्भाच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते, गर्भावस्थेत क्ष-किरण तपासणी शक्यतो टाळावी.

Leave a Comment