गर्भारपणाचे शेवटचे तीन महिने

१) गर्भारपणाचे शेवटचे काही आठवडे बहुतेक गरोदर स्त्रियांना अवघडलेपणामुळे खूपच जड जातात. निरनिराळे त्रास पुन्हा सुरू व्हायला लागतात.

२) पाठ दुखणे :

पाठीच्या कण्याच्या वक्रतेमध्ये बदल झाल्यामुळे पाठीच्या खालच्या भागात दुखायला लागते. बसायला योग्य पद्धतीची खुर्ची वापरणे, तसेच खूप जास्त मऊ/कडक गादीवर न झोपणे, वजन प्रमाणापेक्षा जास्त न वाढू देणे; तसेच दैनंदिन शारीरिक हालचाली केल्याने फायदा होतो.

३) श्वास घेण्यास त्रास वाटणे :

या तीन महिन्यांत पोटाचा आकार बराच वाढतो व त्यामुळे श्वासपटलावर दबाव येतो. तसेच फुफ्फुसांचा खालचा भागही दबला जातो. यामुळे बहुतेक स्त्रियांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो. विशेषत: आडवे झोपल्यावर त्रास वाढतो. एखाद्या आरामखुर्चीचा वापर जास्त केल्यास हा त्रास कमी होतो.

४) झोप न लागणे :

या काळात पोटाचा वाढता आकार, श्वास घ्यायला होणारा त्रास, बाळाची सतत होणारी हालचाल, वारंवार बाथरूमला जावे लागणे, गर्भाशयाचे होणारे वाढते आकुंचन यामुळे रात्री नीट झोप लागू शकत नाही. यासाठी चहा, कॉफीसारखी उत्तेजक पेये संध्याकाळनंतर घेऊ नये, झोपण्यापूर्वी ग्लासभर दूध प्यावे व कोणता तरी गोड पदार्थ रात्रीच्या जेवणात खावा.

५) कुशीवर झोपणे :

गरोदर स्त्रियांनी शक्यतो कुशीवर झोपावे. पाठीवर झोपल्यास रक्तवाहिन्यांवर गर्भाशयाचा दबाव पडतो व गर्भाशयाकडे जाणारा रक्तपुरवठा तात्पुरता कमी होतो.
६) ओटीपोटात, कमरेच्या हाडात दुखणे :

काही स्त्रियांना गर्भावस्थेच्या शेवटच्या काही आठवड्यांत अशा प्रकारे दुखते. बाळाचे डोके जर माकडहाडामध्ये घट्ट बसत असेल तर दुखू शकते. यावर थोडी सहनशीलता वाढवण्याव्यतिरिक्त कोणताही उपाय नाही.
७) वारंवार मूत्रविसर्जनाची भावना होणे :

बाळाचे डोके खालच्या बाजूला सरकायला लागल्यावर मूत्राशयावर त्याचा दबाव पडायला सुरुवात होते. यामुळेच जास्त वेळा बाथरूमला जावे लागते. कोणत्याही प्रकारच्या जंतुसंसर्गामुळे हे होत नाही ना, हे तपास करून बघणे आवश्यक आहे. असे असल्यास योग्य ती जंतुनाशक औषधे घ्यावी.

८) पायावर सूज येणे, पोट-या दुखणे, हातापायाला मुंग्या येणे :

अशा अनेक प्रकारच्या वेदना जवळजवळ प्रत्येक स्त्रीला शेवटच्या काही दिवसांत होतात. यावर ठोस उपाय फारसा नाही. परंतु व्हिटॅमिन्स व क्षार भरपूर प्रमाणात मिळतील असा सकस आहार घेणे, आवश्यकता भासल्यास डॉक्टरांनी सुचवलेल्या गोळ्या घेणे यामुळे त्रास कमी होऊ शकतो. हे सर्व तात्पुरते आहे व प्रसूतीनंतर नीट होणार आहे हे लक्षात घ्यावे.

९) बाळाची हालचाल व स्थिती :

शेवटच्या तीन महिन्यांत बाळ जवळजवळ दुप्पट प्रमाणात वाढते व त्याला फारशी हालचाल करायला जागा उरत नाही. सर्वसाधारण ३२व्या आठवड्यामध्ये बाळाची स्थिती निश्चित होते. ३२ आठवड्यांनंतर बाळाच्या फक्त हातापायांची व शरीराची हालचाल तिथल्या तिथेच होते. यामुळे बाळाची हालचाल कमी होते. साधारण २४ तासांत बाळाची हालचाल १२-१४ वेळा जाणवली तर काळजी करण्याचे काही कारण नाही. परंतु कमी वेळा जाणवल्यास ताबडतोब प्रसूतितज्ञांना नजरेस आणून द्यावे. बाळही पोटात असताना काही काळ झोपते. तेव्हा ही हालचाल १-२ तास होत नाही व अचानक खूप वेळा झाल्यासारखी वाटते.

१०) सोनोग्राफी :

साधारण ३६व्या ते ३८व्या आठवड्यात सोनोग्राफीचा तपास करणे आवश्यक आहे. बाळाची स्थिती, साधारण वजन, गर्भजलाचे प्रमाण व वारेची तपासणी हे बघितल्यावर प्रसूती केव्हा व कशी होईल याचा अंदाज बांधता येतो.

११) आपले कपडे, लागणा-या वस्तू, औषधे, कागदपत्रे, बाळाचे कपडे इ. भरून बॅग तयार ठेवणे शेवटच्या २-३ आठवड्यांत आवश्यक आहे.

प्रसूतीची सुरुवात झाल्याची लक्षणे :

१) रक्तमिश्रित स्राव अंगावरून जाणे.

२) पोटात/ पाठीत थोड्या थोड्या वेळाने दुखायला लागणे.

३) अचानक पाण्यासारखा खूप स्राव होणे.

४) वारंवार मल/मूत्र विसर्जनाची भावना होणे.

५) अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांना कळवणे अत्यावश्यक आहे. त्यानंतर त्यांच्या सल्ल्याप्रमाणे वागावे.

Leave a Comment