दात किडण्याची लक्षणे

१. बऱ्याच लोकांना त्यांचे दात किडले आहेत हे दात दुखायला लागल्यावर किंवा डेंटिस्टकडे गेल्यावर समजते. दात किती किडले आहेत यावर त्यांचे दुखण्याचे प्रमाण अवलंबून असते. काही जणांचे दात किडले तरी दुखत नाहीत. कधीकधी सायनसप्रमणे गालाचा भाग किंवा कान दुखू लागतात. म्हणूनच जाणून घ्या दात किडण्याची ही 10 लक्षणे :

२. दातांवर पांढरे ठिपके पडणे : निरोगी दातांच्या वरच्या थरातील इनॅमलमुळे दातांचा रंग टिकून राहण्यास मदत होते. दात किडल्यावर या इनॅमलमधील कॅल्शियम निघून जाते आणि दातांवर पांढरे ठिपके पडण्यास सुरुवात होते. हे बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही.

३. अन्नकण दातांवर/दातांच्या फटींमध्ये अडकणे : दात किडण्याऱ्या लोकांमध्ये हे लक्षण बऱ्याचदा दिसून येते. कीड दोन दातांमधील फटींमध्ये पोकळी तयार करते. यामुळे अन्नाचे कण दातांत अडकतात. दातांमध्ये अशी पोकळी असेल तर दात स्वच्छ करताना फ्लॉस सहपणे दोन दातांच्या फटींमधून फिरतो.

४. ठराविक दातांनी व्यवस्थित चावता न येणे : दात किडायला लागल्यानंतर दाताच्या आतमधील व आजूबाजूच्या भागात पू तयार होण्यास सुरुवात होते. त्यामुळे घास चावताना या दाताने चावले असता दुखते.

५. अति संवेदनशील दात : थंड पदार्थ खाल्यानंतर ठणका बसला तर आपल्या दातात पोकळी निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे असे समजावे. यासाठी वेळेवर उपचार करून त्यात फिलींग करून घेतले तर आपला दात चांगला राहू शकतो. परंतु तुम्ही गरम पदार्थ खाल्यानंतर जर तुमचा दात ठणकत असेल तर मात्र तुमचा दात पूर्णपणे खराब झाला असे समजावे. यासाठी रूट कॅनाल करून उपचार करता येतो.

६. दाताचे तुकडे पडणे : साधारण कठीण पदार्थ खाताना दाताचे तुकडे पडणे हे दात किडण्याचे लक्षण आहे. दाताचा सर्वात वरचा थर अगोदर खराब व्हायला सुरुवात होते. त्यामुळे दाताचे तुकडे पडण्यास किंवा त्याला चिरा पडण्यास सुरुवात होते.

७. दात काळे पडणे : बऱ्याचदा लोक दातांना व्हाइटनिंग ट्रिटमेंट घेण्यासाठी डेंटिस्टकडे जातात. दात काळे पडणे हेही दात खराब होण्याचेच लक्षण आहे. दाताचा आतला भाग किडण्यास सुरुवात झाली की, त्याच्या वरचा थरही किडायला लागतो. हे दोन्ही थर किडल्यामुळे दात काळसर दिसू लागतात.

८. तोंडाला दुर्गंधी येणे : दातात पोकळी असेल तर जेवल्यानंतर अन्नाचे कण दातात अडकतात. ते पूर्णपणे न निघाल्यामुळे तोंडाला दुर्गंधी येते.

९. दातांमधून रक्त येणे : दोन दातांच्या मध्ये पोकळी निर्माण झाल्यानंतर त्या पोकळीमध्ये हिरड्या वाढू लागतात. दात घासताना त्यांना ब्रश लागल्यावर रक्त येऊ लागते.

१०. दातांमधील फटी वाढणे :
मागच्या दातांमधील फटी जर जास्त मोठ्या असतील तर कालांतराने पुढच्या दातांमध्येही फटी दिसू लागतात.

११. हिरड्यांना सूज येणे : जेव्हा दाताचा आतला भाग किडतो, तेव्हा दाताच्या आजूबाजूचा भागही किडून तेथे पू तयार होतो. त्यामुळे हिरड्यांना सूज आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *