दात का किडतात, किडू नयेत म्हणून काय घ्याल काळजी

१. दात का किडतात हा प्रत्येक रुग्णांकडून आम्हास विचारण्यात येणारा प्रश्न दात किडणे हे आपल्या सवयी आणि आहार यावर अवलंबून असते.

२. दातांची नीट काळजी न घेतल्यास वेळोवेळी स्वच्छ न करणे तसेच वेळी अवेळी खाणे यामुळे दातांवर अन्नकण विशेषत: गोड व चिकट पदार्थ साठून राहतात.

३. तोंडातील बॅक्टेरियाच्या संपर्कात येऊन लॅक्टिक अ‍ॅसिड नावाचे आम्ल तयार होते. याच आम्लामुळे दाताचा वरता थर (इनॅमल) झिजू लागते. दाताला खड्डा पडतो. त्यात पुन्हा अन्नकण अडकतात आणि कडी हळूहळू खोल आतल्या थरापर्यंत पसरत जाते. जर कीड इनॅमलपर्यंतच असेल तर सहसा दातास फार त्रास होत नाही.

४. लागलेली कीड योग्यवेळेस स्वच्छ करून त्या जागी दातांच्या रंगाचे सिमेंट भरून दात पूर्ववत करता येतो. यावेळेस उपचार न केल्यास कीड खालच्या थरापर्र्यंंत म्हणजे डेंटीनपर्यंत पोहोचते आणि थंड, गोड, गरम खातांना दात दुखायला लागतो. याही अवस्थेत बरेचदा दातांमध्ये सिमेंट भरता येते.

५. किडलेल्या दातांची वेळीच काळजी न घेतल्यास कीड आतील भागात पसरून दाताच्या मुळापर्यंत पोहोचते. तेथील पातळ हाडाचा छेद करून तेथे गळू (पू ची गाठ) तयार होते. यामुळे दात ठणकतो, सूज येते, कधी हा दात टिचकी मारल्याससुद्धा दु:खू लागतो. बरेचदा झोपल्यास किंवा खाली वाकल्याससुद्धा दात जास्त दुखल्यासारखा वाटतो.

६. या वेळेस दाताचा क्ष-किरण (एक्स-रे) काढून दाताची आतील रचना तसेच कीड कुठल्या अवस्थेत आहे हे बघितले जाते. नंतर (रुट कॅनाल) दाताच्या नसेची ट्रिटमेंट करून तो वाचविता येतोे. या ट्रिटमेंटद्वारे दातातील मूळापासूनची कीड काढून त्यात दातांच्या रंगाचे सिमेंट भरून वर सिरॅमिकची टोपी बसविली जाते.

७. दात किडू नये म्हणून काय काळजी घ्यावी :

1. ब्रशिंग व गुळणा याद्वारे दात स्वच्छ ठेवावे. रोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी दात घासावे.

2. खाणे हे सुयोग्य वेळी असावे. गोड पदार्थांचे अतिसेवन टाळावे. सकस आहार घ्यावा.

3. दात कोरू नये. डेंटल फ्लॉस वापरावा.

4. कृत्रिम दातांची योग्य काळजी घ्यावी.

5. वेडे-वाकडे दात असल्यास अन्नकण अडकून कीड लागू शकते. तेव्हा दात सरळ करण्याची ट्रिटमेंट करून घ्यावी.

6. एखादा दात काढलेला असल्यास त्याजागी दुसरा दात न बसवल्यास कालांतराने इतर दात त्याजागी सरकतात व कीड लागणे, हिरड्या सुजणे, असे त्रास उद्भवतात.

7. दातांच्या डॉक्टरांचा नियमीत सल्ला घेणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *